Pandharpur Live News Online: पुणे: राज्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या वळवाने दाणादाण उडवून दिली आहे. आता मात्र या वळवाचे रूपांतर गारपिटीमध्ये झाले असून, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील वायव्य भागात 15 आणि 16 मेदरम्यान गारपीट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात येत्या चोवीस तासांत अमरावती, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, नांदेडसह मध्य महाराष्ट्रातील पुणे परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कर्नाटकपासून ते मराठवाड्यापर्यंत वार्यांची चक्राकार स्थिती तयार झाली आहे. तसेच, वायव्य मध्य प्रदेश ते मध्य महाराष्ट्र ते दक्षिण कर्नाटकपर्यंत आणखी एक चक्राकार स्थिती तयार झाली आहे. तसेच, कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याबरोबरच कोकण व मुंबईमध्ये मात्र उष्ण व दमट हवामान राहून उष्णतेची लाट राहील. असे असले तरी चक्राकार स्थितीमुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि वायव्य विदर्भातील बहुतांश भागांत गारपिटीचा अंदाज आहे.