नाशिक :लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये सभा घेतली. या सभेत ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणाची सुरूवात हिंदू बांधवांनो अशी होत नसल्याची टीका विरोधकांकडून केली जाते, यावरही उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मी नेहमी माझ्या भाषणाची सुरूवात तमाम हिंदू बांधवांनो अशी करतो, मात्र निवडणूक देशाची आहे, त्यामुळे मी तमाम देशभक्तांनो अशी करतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘भाजपवर मतांसाठी दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे. भाजपकडे मोदींशिवाय पंतप्रधानपदासाठी चेहरा नाही. 4 तारखेला भाजप फुटल्याशिवाय राहणार नाही. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, 4 जूननंतर तुम्ही पंतप्रधान नसाल, मला भाजपची काळजी वाटते. 2 वर्षांनंतर मोदी तुम्ही झोळी घेऊन निघून जाल, तेव्हा भाजपची काय अवस्था होईल? निदान इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचे खूप चेहरे आहेत, तुमच्याकडे आहेत का? मोदी सगळीकडे फिरा, तुमचा सुपडा साफ होईल’, असं टीकास्त्र उद्धव ठाकरेंनी डागलं आहे.
’70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री किती कोटीचा? शिवसेनेला नकली म्हणणारे बेअकली. 2019 ला मोदींसाठी मत मागितलं यासाठी माफी मागतो. 10 वर्षात मोदींनी महाराष्ट्राला फसवलं, देशाला फसवलं. धनुष्यबाण चोरलं, पण माझी मशाल पेटली आहे. काही जण चपरासी झाले तरी चालेल, पण पुन्हा येईन म्हणतात. मोदी-शाह गद्दारीच्या कटाचे सूत्रधार आहेत. भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये या, हीच मोदींची गॅरंटी आहे’, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे.