👁 2 Views

Pandharpur : पंढरपूर तालुक्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण, आरोग्य विभागात क व ड संवर्गातील 11 हजार पदे भरण्यात येत असून 1 हजार 750 डॉक्टरांची पदभरती प्रक्रिया सुरू, आयुष्यमान भारत योजनेतून उभारलेल्या आरोग्य उपकेंद्राचा 7 ते 8 गावांतील नागरिकांना लाभ होणार ! – आमदार समाधान आवताडे

 पंढरपूर, (दि.23):- यावेळी आमदार समाधान आवताडे म्हणाले आयुष्यमान भारत योजनेतून उभारलेल्या आरोग्य उपकेंद्राचा 7 ते 8 गावांतील नागरिकांना लाभ होणार आहे. आरोग्य विभागाकडून पंढरपूर येथे 200 बेडचे तर मंगळवेढा येथे 100 बेडचे  रुग्णालय सुरु करण्याबाबत मान्यता मिळाली असल्याचे सांगितले. रांझणी येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे पंढरपूर तालुक्यासह मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांना याचा लाभ होणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख यांनी यावेळी सांगितले.

          पंढरपूर तालुक्यातील आयुष्यामान आरोग्य मंदीर प्राथमिक आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना रांझणी, आयुष्यमान आरोग्य उपकेंद्र अनवली, सरकोली ते शंकरगाव रस्ता सुधारणा व देखभाल कामाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकात पाटील व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार जय सिध्देश्वर महास्वामी, आमदार समाधान आवताडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, प्रांताधिकारी सचिन इतापे, तहसिलदार सचिन लंगुटे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, गटविकास अधिकारी मिरगणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोधले, उमेश परिचारक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत नाना देशमुख, प्रा.शिवाजी सावंत यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

   गावातील प्रत्येक नागरिकाला स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी   केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून भर दिला जात आहे. ग्रामीण भागातील जनतेला वेळेवर आरोग्य सुविधा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र महत्वाचे असून, नूतन इमारतीमुळे नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील.असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. पालकमंत्री पाटील म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमुळे नागरिकांना २४ तास आरोग्य सुविधा मिळेल. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केंद्रातील सुविधांचा नागरिकांसाठी क्षमतेने उपयोग करावा. एक ही गरजू रुग्ण आरोग्यसेवेपासून वंचित राहणार नाही यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून दर्जेदार सुविधांचा लाभ उपलब्ध करून दिला पाहिजे. तसेच आयुषमान भारत योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंत उपचार सुविधा मिळू शकतात. आरोग्यावर होणारा खर्च उपचार घेणाऱ्या व्यक्तीला देण्याची गरज नाही. यासाठी प्रत्येक कुटुंबाने आयुष्यमान कार्ड काढावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

             यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले, आरोग्य केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना स्थानिक पातळीवर आवश्यक आरोग्य सेवासुविधा मिळाव्यात, प्रत्येकाने काटेकोरपणे आपली जबाबदारी पार पाडावी. आरोग्य केंद्राच्याबाबतीत कोणाचीही तक्रार येणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. नागरिकांना आरोग्य केंद्रात तात्काळ व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच आरोग्य केंद्रातील साधन सामुग्रीचा वापर व्हावा. तसेच पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून पदभरती प्रक्रिया सुरु आहे. आरोग्य विभागात क व ड संवर्गातील 11 हजार पदे भरण्यात येत असून 1 हजार 750 डॉक्टरांची पदभरती प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक आरोग्य केंद्र,  शासकीय रुग्णालय याठिकाणी पुर्णक्षमतेने वैद्यकीय अधिकारी  व कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक तालुक्यात डायलेसीस सेंटरची उभारणी केली जाणार असल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले.         

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *