गोवा येथे सुरू असलेल्या ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथील कु.वैष्णवी अनिल खटावकर हिने ५० मीटर फ्री पिस्टल ज्युनियर या प्रकारात कांस्यपदक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.
वैष्णवीने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेत पदक मिळवून आपल्या कौशल्याची छाप पाडली. तिच्या या यशामुळे कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
स्पर्धेतील पदक वितरण समारंभात महाराष्ट्र रायफल असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. अशोक पंडित तसेच महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या जनरल सेक्रेटरी व नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाच्या जॉइंट सेक्रेटरी मा. सौ. शीला कानंगो यांच्या हस्ते वैष्णवीला कांस्यपदक प्रदान करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक तसेच कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजिस्ट्रार गणेश वाळके, उपप्राचार्य प्रा. जगदीश मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. राहुल पांचाळ, विभाग प्रमुख डॉ एस एम लंबे, डॉ एस व्ही एकलारकर, डॉ. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले व सर्व प्राध्यापक यांनी वैष्णवी चे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वैष्णवीच्या या यशाबद्दल आर्यमान शूटिंग स्पोर्ट्स क्लब, पिलीवच्या वतीने तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिने यश संपादन करावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
कर्मयोगी इन्स्टिटयूट चे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. गणेश बागल यांचे कु. वैष्णवी खटावकर यांना विशेष मार्गदर्शन मिळाले.

