👁 174 Views

पारदर्शक प्रशासन आणि निष्पक्ष पोलिसींगचे शतक: सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची १०० दिवसांची धडाकेबाज कारकीर्द

पारदर्शक प्रशासन आणि निष्पक्ष पोलिसींगचे शतक: सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची १०० दिवसांची धडाकेबाज कारकीर्द

सातारा: सातारा जिल्हा परिषदेतील राजकीय वाद आणि पोलिसांच्या भूमिकेवरून उठलेला गदारोळ यामुळे एप्रिल २०२६ च्या सुमारास सातारा पोलीस दलाची संपूर्ण राज्यभरात चर्चा झाली होती. अशा एका अत्यंत कठीण, आव्हानात्मक आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील वातावरणात २२ एप्रिल २०२६ रोजी नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सातारा जिल्ह्याचा पदभार हाती घेतला. आज त्यांच्या या यशस्वी आणि धडाकेबाज कारकीर्दीला १०० दिवस पूर्ण होत आहेत. पदभाराच्या पहिल्याच दिवशी त्यांनी “पूर्वी काय झाले यावर चर्चा करण्यापेक्षा निष्पक्ष व लोकाभिमुख प्रशासन राबवून नागरिकांचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे आहे” असा स्पष्ट संदेश देत सातारकरांना आश्वस्त केले होते. आज १०० दिवसांनंतर मागे वळून पाहताना, त्यांनी सातारकरांना दिलेला हा शब्द केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
पदभार स्वीकारताना नव्या एसपींसमोर सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे पोलिसांची प्रतिमा सुधारणे आणि दलाला दबावातून मुक्त करून सर्वसामान्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे. पोलिसांवरील विश्वास पुन्हा रुजवण्यासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच कठोर आणि निष्पक्ष भूमिका घेतली. कोणाच्याही हस्तक्षेपाला थारा न देता कायदेशीर बाबींमध्ये आणलेली पारदर्शकता, अवैध धंदे आणि गुंडगिरीवर घातलेला लगाम यामुळे अल्पवधीतच पोलीस दलाची पत पुन्हा उंचावली.


या शंभर दिवसांच्या प्रवासात त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा पॅटर्न समजावून घेत त्या-त्या भागातील गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना आखल्या. गंभीर व प्रलंबित गुन्ह्यांचा सखोल आढावा घेऊन तपासाची गती वाढवली आणि नागरिकांच्या तक्रारींवर वेळेत तोडगा काढण्यासाठी यंत्रणा अधिक सक्षम केली. त्यामुळे आज पोलीस ठाण्यात येणाऱ्या सामान्य नागरिकाला दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सातारा जिल्हा पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांचा विश्वास जिंकण्याच्या दिशेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारीवर कठोर कारवाई, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, जनसंपर्क आणि लोकाभिमुख पोलीसिंग यांचा सुंदर समन्वय पाहायला मिळत आहे.

आषाढी वारीसारख्या लाखो भाविकांच्या उपस्थितीच्या सोहळ्यांमध्ये आधुनिक ड्रोन, सीसीटीव्ही नियंत्रण व्यवस्था आणि काटेकोर नियोजनाच्या माध्यमातून सुरक्षितता सुनिश्चित करण्यात सातारा पोलिसांनी उल्लेखनीय भूमिका बजावली. यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी असूनही कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे राखली गेली.

अंमली पदार्थांविरोधातील लढ्यात सातारा पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलत ₹64.13 लाख किमतीचे तब्बल 509 किलो गांजा, गांजाची झाडे आणि अफूची झाडे नष्ट केली. पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखालील अंमली पदार्थ नाश समितीने सर्व न्यायालयीन आणि वैज्ञानिक प्रक्रिया पूर्ण करून हा मुद्देमाल कराड येथील जैव कचरा निर्मूलन प्रकल्पात नष्ट केला. ही कारवाई केवळ जप्तीपुरती मर्यादित नसून, समाजाला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्याच्या सातारा पोलिसांच्या ठाम भूमिकेचे प्रतीक आहे.

याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश करून अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली. कोरेगाव तालुक्यात सुरू असलेल्या या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना अमेझॉन ऑर्डर, डिजिटल अरेस्ट आणि गिफ्ट व्हाउचरच्या नावाखाली फसवले जात होते. अचूक गुप्त माहिती, तांत्रिक तपास आणि नियोजनबद्ध छापेमारीच्या माध्यमातून 17 पुरुष आणि 4 महिलांसह संपूर्ण टोळीला अटक करण्यात आली. या कारवाईमुळे केवळ एका मोठ्या सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश झाला नाही, तर सातारा पोलिसांची सायबर गुन्ह्यांवर प्रभावी पकडही सिद्ध झाली.

सातारा पोलीस दलाने केवळ अंमली पदार्थ आणि सायबर गुन्ह्यांवरच नव्हे, तर अवैध शस्त्र बाळगणारे, बेकायदा शस्त्रांची खरेदी-विक्री करणारी साखळी आणि चक्री जुगार अड्डे यांच्याविरोधातही धडाकेबाज कारवाया केल्या आहेत. जिल्ह्यात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, संघटित गुन्हेगारीला आळा बसावा आणि सर्वसामान्य नागरिक निर्भय वातावरणात जीवन जगावेत, या उद्देशाने सातारा पोलिसांनी सातत्याने विशेष मोहिमा राबवल्या. सातारा पोलिसांच्या ठोस आणि परिणामकारक कामगिरीची साक्ष आहे. या धाडसी कारवायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

एसपी निखिल पिंगळे यांच्या रुपाने सातारकरांना एका कठोर प्रशासकासोबतच अत्यंत संवेदनशील आणि अभ्यासू अधिकारी लाभला आहे. गुन्हेगारीवर कठोर प्रहार करतानाच त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांना दिलेले प्राधान्य उल्लेखनीय आहे. स्पर्धा परीक्षा केंद्रांच्या उद्घाटनासारख्या कार्यक्रमांतून तरुणांना गुन्हेगारी व वाईट प्रवृत्तींपासून दूर ठेवून राष्ट्रउभारणीकडे वळवण्यासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन त्यांच्यातील संवेदनशीलतेची ओळख करून देते. “पोलीस हे नागरिकांचे प्रतिबिंब असतात, समाज जसा तसे पोलीस घडतात” या भावनेतून त्यांनी समाज आणि पोलीस यांच्यात समन्वयाचा एक मजबूत दुवा सांधला आहे.

कोणत्याही प्रशासकीय कारकीर्दीतील शंभर दिवस हा केवळ एक टप्पा असतो, परंतु निखिल पिंगळे यांनी या अल्पावधीत सातारकरांच्या मनात विश्वासाचे आणि आदराचे स्थान निर्माण केले आहे. वाढलेली गस्त, अवैध धंद्यांचा झालेला सफाया, कोणाच्याही हस्तक्षेपाविना होणारी निष्पक्ष कारवाई आणि सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेली सुरक्षेची भावना या सर्व गोष्टी त्यांच्या यशस्वी १०० दिवसांच्या कामगिरीची साक्ष देतात. पोलीस दलाची निष्पक्ष प्रतिमा आणि जनतेचा विश्वास पुनरुज्जीवित करण्याचे आव्हान पेलणाऱ्या या कार्यक्षम अधिकाऱ्याचे सातारकरांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील धडाकेबाज कारवाईं साठी शुभेच्छा.

एक सातारकर

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *