Solapur Loksabha Election : मोदी सरकारच्या माध्यमातून भीमा नदीवर बांधणार ब्रॉडगेज बंधारे;माजी आमदार प्रशांत परिचारक : पुळुज येथे पांडुरंग परिवाराची विचारविनिमय बैठक

Loading


Pandharpur : प्रतिनिधी

पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येताच भीमा नदीवर ब्रॉडगेज बंधारे बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. सोलापूर लोकसभा निवडणुकीबाबत पांडुरंग परिवाराची १७ गावांची विचारविनिमय बैठक पुळुज येथे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजू गावडे यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी व्यासपीठावर मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे, माजी सभापती दिलीप घाडगे, माजी चेअरमन दिनकर मोरे, दिलीप चव्हाण, सभापती हरीश गायकवाड, उपसभापती राजू गावडे, मंडल अध्यक्ष भास्कर कसगावडे, प्रशांत देशमुख, पंडित भोसले, संतोष घोडके, सुनील भोसले, मोहन खरात, तानाजी पवार, पंडित रोबडे, महादेव बागल, महादेव लवटे, नागनाथ मोहिते, बाबासो पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले, भाजप सरकारने स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी तीन लाख कोटी रुपयांची योजना  मंजूर केली. त्याची कामे आज गावोगावी चालू आहेत. या माध्यमातून ६५ कोटी कुटुंबाला शुद्ध पाणी मिळणार आहे. ८० कोटी लोकांना पुढील पाच वर्षे रेशन भाजप सरकार मोफत देणार आहे. ७५ हजार कोटी रुपये खर्च करून शेतकरी पेन्शन दिली जाते. यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होता हे पैसै थेट शेतकऱ्याच्या खात्यावर येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये भ्रष्टाचाराला आळा बसल्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक याप्रसंगी म्हणाले.

शेतकऱ्यांना एक हजार रुपयांचा युरिया फक्त अडीचशे रुपयांना मिळतो. मोदी सरकारमुळेच हे शक्य झाले. रस्त्यांची कामे, उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना या सरकारने राबवली. ७० वर्षांवरील व्यक्तींना मोफत उपचार, ३०० युनिट वीज मोफत आदी अनेक योजना आगामी काळात येणार आहेत. याकरिता मतदारांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करावे, असे आवाहनही माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी यावेळी केले.

माजी आमदार राजन पाटील म्हणाले, कृष्णा आणि भीमा नदीचे पाणी दुष्काळी भागासाठी देण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही आहेत. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून येणार आहेत. अशावेळी सोलापूरकरांनीही नरेंद्र मोदी यांना समर्थन द्यावे.

भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते म्हणाले, मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाणीव मला आहे. त्यामुळे आगामी काळातही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवून करण्याला प्राधान्य असेल. याकरिता सोलापूरकरांनी भाजप आणि महायुतीच्या पाठीशी रहावे, असेही आमदार राम सातपुते याप्रसंगी म्हणाले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *