पंढरपूर लाईव्ह ला मंदिराबाबतची माहिती देताना मुख्य पुजारी श्री.स्वप्नील धारुरकर… बघा खालील व्हिडीओ
पूर्वपरंपरेनुसार मार्गशिर्ष महिन्यात तब्बल एक महिनाभर पंढरीच्या चंद्रभागेच्या पात्रात असलेले ‘विष्णुपद’ या ठिकाणी अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात.
या ठिकाणी मित्र-परिवारांसह सहभोजनाचा आनंद घेतात. या महिन्यात प्रत्यक्ष पंढरीचा राजा श्रीविठ्ठल येथे वास्तव्यास असतो अशी अख्यायिका आहे.
विष्णुपद हे स्थळ चंद्रभागेच्या पात्रात असून मंदिराच्या सभोवार चंद्रभागेचे पाणी आहे. मंदिरामध्ये श्रीविष्णुच्या पदचिन्हांचे (पादुकांचे) ठसे आहेत. येथे जवळच चंद्रभागेच्या पात्रातच नारायणाचे व मारुतीचे मंदिर आहे. येथे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नातून चंद्रभागेच्या पात्रात मागील आषाढी यात्रा कालावधीत बांधलेल्या बंधार्यामुळे पात्र पाण्याने दुथडी भरलेले आहे. यामुळे परिसरात सर्वत्र हिरवळ असून अतिशय आल्हाददायक असे वातावरण आहे.
येथे नौकाविहारासाठी अनेक होड्या उपलब्ध असून पंढरपूरमधील कोळी बांधव होड्या चालविण्याचा व्यवसाय येथे करतात. अनेक भाविक विष्णुपद ते पुंडलिक मंदिरापर्यंत होडीमधून नौकाविहाराचा आनंद घेताना आढळून येतात.
येथे येण्यासाठी पंढरपूर-गोपाळपूर च्या मुख्य मार्गावरुन आत प्रवेश करतानाचा रस्ता खुपच अरुंद आहे. त्यातच अॅटोरिक्षावाले सुध्दा आतयेत असल्याने या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी झालेली आढळते. येथे मार्गशिर्ष मध्ये होणारी गर्दी पहाता या महिन्यापूरती तरी या ठिकाणी वाहतुक पोलिसांची आवश्यकता आहे. मात्र येथे वाहतुक पोलिस नसल्यामुळे येथे येणार्या भाविकांना वाहतुकीच्या कोंडीमुळे त्रास सहन करावा लागल्याचे चित्र स्पष्ट दिसून आले.

या मंदिराबाबत ची अधिक महिती देताना मंदिराचे मुख्य पुजारी श्री.स्वप्नील धारुरकर यांनी ‘पंढरपूर लाईव्ह’ शी बोलताना सांगितले की, ‘‘श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांनी जेंव्हा आळंदी क्षेत्री संजीवन समाधी घेतली. तेंव्हा ही समाधी प्रत्यक्ष पंढरीनाथ श्री.विठ्ठलानेच दिली. ज्ञानोबांच्या वियोगाने भगवंत दु:खी झाले. तेंव्हा दु:ख निवारणासाठी ते एकांतवासामध्ये जिथे निघून गेले. तेह चे ठिकाण म्हणजे ‘विष्णुपद’ होय.
पंढरपूरमधील सुपरिचित हरहुन्न्री व्यंगचित्रकार व कलाकार शाम सावजी यांनी नुकतेच या स्थानाबाबत सोशल मिडीयावर आपले मनोगत व्यक्त केले आहे. ते पंढरपूर लाईव्ह च्या वाचकांसाठी जसेच्या तसे साभार प्रसिध्द करत आहोत.

चंद्रभागेचं हे मनमोहक पात्र आमच्या घरापासून अवघ्या १० फुटांवर . रोजच्या धावपळीच्या काळात तिचं हे सौंदर्य नजरेत साठवून घेता येत नाही पण रविवारी दुपारी मात्र ग्यालरीच्या पूर्वेकडच्या भागात एखादी खुर्ची टाकून बसलं कि समाधी अवस्था काय असते याची प्रचीती येते . चंद्रभागेचं हे मोहक रूप निवांतपणे न्याहाळता येतं. संपूर्ण वातावरणात एक निरव शांतता भरून राहिलेली असते . ( वारीच्या आणि एकादशीच्या काळात मात्र इकडच्या ग्यालरीत यायला अंगावर काटा येतो. ) दुरवर पसरलेल्या निळ्या आभाळात घरी पासून ते कावळ्या पर्यंत पक्षांच्या भराऱ्या सुरु असतात . करकोच्यांचे थवे पाण्यात माना खुपसुन बसलेले असतात . गवळ्यांच्या म्हशी निवांतपणे स्नानाचा आनंद लुटत असतात . तुरळकपणे होड्यांची ये जा सुरु असते . पलीकडच्या काठावरची थोडीफार शिल्लक असलेली झाडी आणि हिरवळ कुठेतरी गावाबाहेर निसर्गात आल्याची जाणीव करून देतात .
आग्नेय दिशेला अगदी नजरे समोर विष्णुपद मंदिर आणि नारद मुनी मंदिर दिसते . मार्गशीर्ष महिन्यात या विष्णुपदाला खूप महत्व येते . देव महिनाभर येथे वास्तव्याला जातात असे सांगितले जाते . त्यामुळे येथील मंदिरात महिनाभर भाविकांची गर्दी असते . या विष्णुपदाचे आणि नारद मुनींचे दर्शन घरातूनच होते . तिथून अलीकडे उजव्या हाताला दिसणारे स्मशान जगण्याच्या अंतिम टप्प्याची जाणीव करून देते .
या अंतिम प्रवासासाठी आपल्या माणसाला पोहोचवण्यासाठी आलेले समोर चंद्रभागेत त्याच्या नावाने आंघोळ करताना दिसतात . एकंदर आमच्या या सज्जातून जगण्यातला आनंद आणि दुखः दोन्हींचं दर्शन बसल्या जागी होतं………….श्याम सावजी … पंढरपूर