दर्पणकार : एक द्रष्टे समाजसुधारक

Loading

पत्रकार दिनानिमित्त लेख

            मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, आद्य पत्रकार या नावनेच बाळशास्त्री जांभेकर हे सर्वश्रृत आहेत. त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मराठीतील पहिले वृत्तपत्र  दर्पण या नावाने सुरु केले आणि त्या वेळेपासून ते  दर्पणकार या नावाने संबोधले जावू लागले. बाळशास्त्री यांचा जन्म सिधुदुर्ग जिल्ह्यातील पोंबुर्ले येथे झाला.  मराठी वृत्तपत्र सृष्टीचा पाया भक्कमपणे उभारण्याचे मोलाचे काम बाळशास्त्री यांनी केले. त्यामुळेच त्यांची आठवण म्हणून 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जात आहे.
            भारतात नियतकालिकांच्या उदयाचे श्रेय भारतात आलेल्या युरोपीय लोकांकडे जाते. धर्मप्रसारणासाठी त्यांचा उपयोग केला जात असे. भारतात बंगालमध्ये समाजदर्पण नावाचे पहिले बंगाली  साप्ताहिक सुरु झाले. त्यानंतर बाळशास्त्रींनी   दर्पण हे मराठी मधील वृत्तपत्र सुरु केले. दर्पण सुरुवातीच्या काही काळात पाक्षिक व त्यानंतर साप्ताहिक प्रकाशित  होत होते. बंगाली आणि मराठी या भाषांप्रमाणे इतरही भारतीय भाषेत 19 व्या शतकात कमी अधिक कालांतराने वृत्तपत्र नियतकालिकांचा उदय झाला.
             महाराष्ट्रात तत्कालीन समाज सुधारकांनी पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करुन नवी जीवनमूल्ये रुजवली. पण समाजात असलेल्या अनेक रुढी, चालीरिती, परंपरा, अज्ञान, दारिद्र्य यामुळे समाज व्याधीग्रस्त झाला होता. या विचाराने बाळशास्त्री चिंतेत होते. समाजात असलेल्या अनेक वाईट चालीरिती बंद होण्यासाठी समाजाचे प्रबोधन होणे गरजेचे असून यासाठी वृत्तपत्र हे महत्वाचे माध्यम असल्याने त्यांनी  दर्पण सुरु केले.
            कोकणातील पोंबुर्ले या गावी जन्मलेले बाळशास्त्री शिक्षणासाठी मुंबई येथे दाखल झाले. मुंबईत बापू छत्रे यांच्या निवासस्थानी राहून त्यांनी अध्ययन सुरु केले. आपल्या विलक्षण बुध्दीचातुर्यामुळे त्यांनी त्या वेळच्या मुंबईतील सार्वजनिक जीवनावर छाप टाकली. सन 1830 मध्ये हिंद शाळा पुस्तक मंडळाचे सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती  करण्यात आली आणि त्यांच्यासाठी नवे क्षितिज खुले झाले. राज्यातील शिक्षण विभागाचे संचालक होण्याचा बहूमानही त्यांना मिळाला. प्राध्यापक या नात्याने अध्ययन, अध्यापन, संशोधन  व विस्तार ही कार्ये जोमाने पा पाडली. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात नव  विचारांची लाट निर्माण करण्यासाठी वैचारिक चळवळही सुरु केली.
            बाळशास्त्री जांभेकर हे समाजसुधारक होते आणि  दर्पण  हे त्यांच्या हातातील लोक शिक्षणाचे माध्यम होते. त्याचा वापर त्यांनी समाज प्रबोधनासाठी उत्तमरित्या केला. दर्पण चाअंक हा दोन स्तंभामध्ये काढला जात असे. उभ्या मजकुरात एक कॉलम मराठीत आणि दुसरा कॉलम इंग्रजीत प्रकाशित केला जात असे. मराठी मधील मजकुर हा सामान्य जनतेसाठी असे तर इंग्रजीचा मजकुर हा कॉलममध्ये काय लिहिले आहे हे राज्य कर्त्यांना समजावे यासाठी असे.  त्यामुळे  सुरुवातीच्या काळात दर्पणचे वर्गणीदार कमी होते. तदनंतर लोकांमध्ये ही संकल्पना रुजल्यानंतर अंकाला प्रतिसाद वाढत गेला. 
            ज्ञानाचा प्रसार व्हावा ही बाळशास्त्री जांभेकरांची तळमळ होती. ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार झाल्याशिवाय देशाची प्रगती कशी काय होणार. देशाच्या प्रगतीसाठी आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज असून हे ज्ञान समाजास मिळविण्यासाठी त्यांनी सतत यावर लिखाण केले.  विधवांचा पुनर्विवाह व्हावा यासाठी त्यांनी लिखाण करुन त्यास दर्पण मधून प्रकाशित केले. यावर विचार विनिमय/मंथन हाऊन त्याचे विधवा पुनर्विवाह चळवळीत रुपांतर झाले. विज्ञाननिष्टीत मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते. अर्थातच ते द्रष्टे  समाजसुधारक होते. त्यांना ज्ञानानिष्ठीत समाज अपेक्षित होता. म्हणूनच त्यांनी बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केली. विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना केली. यातून पुढे स्टुडंट्स लिटररी  अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेला प्रेरणा मिळाली. यातुनच  पुढे दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड  यांच्यासारखे दिग्गज कार्यरत झाले.
            बाळशास्त्री जांभेकरांच्या विद्वतेला जोड होती ती त्यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाची.  संस्कृत, मराठी, इंग्रजी व हिंदी या भाषावर त्यांचे प्रभूत्व होते. याशिवाय त्यांना ग्रीक, लॅटीन, फ्रेंच, बंगाली आणि गुजराती भाषाही अवगत होत्या. याशिवाय विज्ञान, भूगोल, गणित, सामान्यज्ञान या विषयावरही त्यांचे प्रभूत्व होते. दर्पणकारांना आपण मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक मानतो.  तसेच एल्फिंस्टन कॉलेजमधील हिंदीचे पहिले प्राध्यापक म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. त्याच बरोबरच रॉयल एशियाटीक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध प्रसिध्द होणारे ते  पहिले भारतीय आहेत. त्यांनी नीतिकन्या, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्थानचा इतिहास, शून्यलब्धिगणित आदी ग्रंथांची निर्मिती केली.
            ज्या काळात समाज निरक्षर, अज्ञानी, अंधश्रध्दा बाळगणारा होता त्या काळात बाळशास्त्रींनी आपल्या लेखनीने या समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

                                                                                                                                                                                                                             एकनाथ पोवार                                                                                                                                                                                                                 माहिती सहायक उपमाहिती कार्यालय, पंढरपूर.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *