सिद्धेश्वर यात्रा वादात ट्विस्ट, सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

Loading

सोलापूर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर सिद्धेश्वर यात्रेचा वाद मिटला असं म्हटलं जात असतानाच, हायकोर्टाच्या निर्णयामुळे पुन्हा एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण हायकोर्टाने देवस्थान कमिटीला दणका देत, यात्रा आयोजनाचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकार्‍यांना बहाल केले आहेत.
उच्च न्यायालयाने ‘माय सोलापूर स्वयंसेवी संस्थे’च्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हा निर्णय दिला.
असं असलं तरी शौचालय,धूळ नियंत्रण आणि सुरक्षा अशा 29 मागण्या मान्य हायकोर्टाने मान्य केल्या. तसंच आपत्कालीन रस्ता वापरायलाही परवानगी दिली.
या यात्रेवरून जिल्हाधिकारी तुकारम मुंढे विरुद्ध मंदिर समिती, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख असा वाद आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा वाद सुरू आहे.
यात्रेसंदर्भात दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यात ‘सह्याद्री’ अतिथीगृहात बैठक झाली. त्यात यावर्षी यात्रेसाठी आपत्कालील रस्ता वापरण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला.
मात्र पुढील वर्षी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून निर्णय घेण्यात येईल, असंही बैठकीत निश्चित करण्यात आलं आहे.
काय आहे वाद?
सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेच्या नियोजनावरुन सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आणि पालकमंत्री विजय देशमुख यांच्यात गेल्या वर्षभरापासून वाद सुरु आहे. सिद्धरामेश्वर यात्रेत पालकमंत्री विजय देशमुख प्रमुख मानकरी आहेत. मात्र त्यांना अडचणीत आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली जिल्हाधिकाऱ्यांनी जाचक नियम लागू केल्याचा दावा केला जात आहे.
यात्रा मार्गावर मॅट घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र या मॅटवरुन नंदी ध्वज धारण करणारे मानकरी आणि हजारो भाविक घसरण्याची शक्यता आहे. कायदेशीर बाबी आणि परंपरा यांचे दाखले देत मंदिर समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला विरोध केला. पण जिल्हाधिकारी आपल्या निर्णयावर ठाम असून बदल करणाऱ्यांवर प्रसंगी गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र विरोधानंतर जिल्हाधिकारी मुंढे यांनी माघार घेतली.
परंतु आपत्कालीन रस्त्याचा पेच कायम होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संरक्षक भिंतीला समांतर बनवलेला नवा रस्ता आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी पूर्णपणे खुला ठेवावा. तिथे दुकानं, स्टॉल लावण्यास परवानगी देऊ नये, अशी सूचना तुकाराम मुंढे यांनी पोलिस आयुक्त तसंच महापालिका आयुक्तांना दिल्या होत्या. मात्र आपत्कालीन रस्ता परंपरेप्रमाणे देवस्थानाला खुला करावा या मागणीसाठी देवस्थान समितीने चक्री उपोषण केलं होतं.
याप्रकरणी पोलीस आयुक्त चोकलिंगम यांनी मध्यस्ती करून वाट मिटवण्याचा प्रयत्न केला होता.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *