
हायड्रोफोनिक म्हणजे, स्ट्रॉबेरी रोपांची लागवड जमिनीत न करता कुंड्या अथवा ट्रफमध्ये केली जाते. त्यात मातीऐवजी नारळाची भुकटी टाकली जाते. रोपांना आवश्यक असणारी मुलद्रव्ये ज्यामध्ये एनपीके (प्रायमरी), कॅल्शिअम, मॅग्नेशिअम सल्फर (सेंकडरी) तसेच लोह, बोरॉन, थ्रिंक, कॉपर, अमोनिअम, मॉली या सुक्ष्म अन्नद्रव्यांची पाण्याच्या माध्यमातून पूर्तता केली जाते. या तंत्रज्ञानामुळे पाण्याची ९० टक्के बचत होते. या तंत्रज्ञानाच्या स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी गुंठा ४० हजार रुपये इतका खर्च येतो.
हायड्रोफोनिक स्ट्रॉबेरीचा रंग, चव व सर्व गुणधर्म हे जमिनीतील स्ट्रॉबेरीप्रमाणेच असतात. यामुळे उत्पादनात दुपटीने वाढ होत असून, शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढत आहे. भिलार येथील किसन भिलारे यांनी राज्यात सर्वप्रथम याचा अवलंब करून स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले. प्रारंभी दोन गुंठे क्षेत्रात केलेला हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर तालुक्यातील २० शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान अवलंबविले.
अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलाचा स्ट्रॉबेरीवर परिणाम होतो. गेल्या दोन वर्षांपासून ही परिस्थिती आहे. त्यामुळे उत्पादनातही काही प्रमाणात घट झाली आहे.