सोमवार, 11 जानेवारी 2016
नवी दिल्ली- नवी दिल्लीत पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून बड्या धेंडांच्या कुपूत्रांची हैवानीयत समोर आली आहे. रईसजाद्यांनी एका असहाय मुलीवर केलेल्या अत्याचाराने दिल्लीसह संपुर्ण देश हादरला आहे.
याबाबत समजलेले सविस्तर वृत्त असे की, उच्चभ्रू तरुणांनी आलिशान गाडीतून एका किशोरवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार केले, नंतर तिच्यावर दोन गोळ्या झाडून एका खोल विहिरीत फेकून दिले. राजधानी दिल्लीजवळ ही घटना घडली.
पीडित तरुणी 22 नोव्हेंबर रोजी बाजारातून घरी येत असताना ग्रेटर नोएडा येथील तिच्या घराजवळून 3 तरुणांनी तिचे अपहरण करण्यात आले. पांढर्या रंगाच्या एका आलिशान एसयूव्ही गाडीतून तिला एका फार्महाऊसवर घेऊन गेले. तिथे त्यांनी सलग पंधरा दिवस तिच्यावर तिघांनी बलात्कार केले. नंतर 5 डिसेंबर रोजी रात्री तिला जवळच्या शेतात नेऊन तिच्यावर दोन गोळ्या झाडल्या. ती जिवंत वाचू नये यासाठी तिला तेथील खोल विहिरीत फेकून दिले.
नग्न अवस्थेत फेकून ती 13 वर्षीय मुलगी केवळ जगण्याच्या इच्छाशक्तीमुळे वाचली. शुद्धीवर आल्यावर तिच्या छातीत घुसलेली बंदुकीची गोळी तिने स्वतः हाताने बाहेर काढली. दुसरी गोळी अद्याप तिच्या पाठीत आहे, मात्र तिच्या जिवाला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
त्या शेताचे मालक बाबल यांच्या घरातील लहान मुलगा 6 डिसेंबर रोजी शेतात खेळायला गेला असताना त्याने पीडित मुलीचे ओरडणे ऐकले. मुलाने त्याबद्दल सांगितल्यावर 42 वर्षीय बाबल यांनी ताबडतोब पोलिसांना कळविले व दोरी टाकून त्या मुलीला बाहेर काढले.