बॉलीवूडमधील मराठमोळे यश

Loading

मराठमोळ्या कलाकारांनीही ‘बॉलीवूड’मध्ये स्वत:ची जागा निर्माण करून एक आदरयुक्त दरारा निर्माण केला आहे. सध्याची स्थिती अशी आहे, की एक तरी मराठी चेहरा घेतल्याशिवाय हिंदी चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही.
आज मराठी चित्रपटांनी सातासमुद्रापार झेंडा फडकवून मराठी संस्कृतीची शान उंचावली आहेच; पण मराठमोळ्या कलाकारांनीही ‘बॉलीवूड’मध्ये स्वत:ची जागा निर्माण करून एक आदरयुक्त दरारा निर्माण केला आहे. सध्याची स्थिती अशी आहे, की एक तरी मराठी चेहरा घेतल्याशिवाय हिंदी चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही. मग तो विषय मराठी मातीशी निगडित का असेना! नुकताच आलेला संजय लीला भन्साळी यांचा ‘बाजीराव मस्तानी’ याचे ज्वलंत उदाहरण म्हणता येईल. मिलिंद सोमण, अनुजा गोखले, गणेश यादव, वैभव तत्त्ववादी अशा अनेक मराठी कलाकारांना चित्रपटात स्थान मिळाले. अनेक वर्षांपासून मराठमोळे चेहरे बॉलीवूडमध्ये झळकण्याची परंपरा चालत आली आहे. मराठी कलाकारांच्या सशक्त अभिनयाची दखल बॉलीवूडकरांना घेणे हे नेहमी भागच पडले आहे. अगदी दुर्गा खोटे, सुलोचना, ललिता पवार, नूतन, तनुजा, स्मिता पाटील, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, डॉ. मोहन आगाशे, विक्रम गोखले, सचिन पिळगावकर, डॉ. जब्बार पटेल, रिमा लागू, नाना पाटेकर अशा दिग्गज कलाकारांची यात प्रामुख्याने नावे घेता येतील. ही परंपरा कधीच खंडित झाली नाही; उलट हे प्रमाण वर्षागणिक वाढतच गेले. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, अजिंक्य देव, मृणाल कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर यांच्यापासून ऊर्मिला मातोंडकर, वर्षा उसगावकर, सोनाली कुलकर्णी आदी मराठमोळ्या कलाकारांनाही बॉलीवूडमध्ये नशीब अजमावून यशस्वितेकडे वाटचाल केली. रजनीकांतचे मूळ नाव हे शिवाजी गायकवाड; पण या नावाने ‘टॉलीवूड’मध्ये धुमाकूळ घालून एक अढळपद निर्माण केले; इतके की त्यांच्या चाहत्यांनी हे नाव हृदयावर कोरून त्यांना ‘देवत्व’ बहाल केले. या कलाकारांनी घेतलेली ही यशोभरारी नक्कीच अभिमानास्पद अशीच आहे. त्यांच्या भूमिकांवर थोडी नजर टाकली, तर त्यातील काही कलाकार चरित्र भूमिकांमध्ये झळकले. मात्र हेही तितकेच खरे आहे, की या भूमिकांचे त्यांनी सोने केले. यामधील काही कलाकारांचा अपवाद सोडला, तर या कलाकारांनी मराठीशी आपली नाळ अद्यापही तोडलेली नाही, हे विशेष म्हणावे लागेल. महेश मांजरेकर, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, राधिका आपटे, सई ताम्हणकर, सागरिका घाटगे या कलाकारांच्या पावलावर पाऊल टाकत आता सायली भगत, मंजिरी फडणीस असे काही नवे चेहरेदेखील बॉलीवूडमध्ये एंट्री करीत आहेत. मात्र अजून तरी म्हणावा तसा रोल त्यांना मिळू न शकल्याने त्यांना स्वत:ला सिद्ध करता आलेले नाही.
विद्या बालन, टिस्का चोप्रासारख्या अमराठी अभिनेत्री मराठीकडे वळल्या; मात्र लाखो हृदयांची धडकन असलेल्या माधुरी दीक्षितने वयाची ४५ वर्षे पार केली, तरी तिला अद्याप मराठीमध्ये काम करण्यास मुहूर्त मिळालेला नाही. हीच गोष्ट मुग्धा गोडसेच्या बाबतीतही लागू होते. आपल्याच मराठी भाषेत काम करण्याची लाज वाटते का? माधुरीला मराठीमध्ये पाहण्याची प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. आता बघू या माधुरीचे दर्शन मराठीत कधी घडते ते!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *