बंगळुरू, दि. १४ – डोकेदुखीचा प्रचंड त्रास होत असल्याने औषधे आणण्याची परवानगी मागण्यासाठी म्हणून बॉसच्या केबिनमध्ये गेलेल्या तरुणीला बॉसने व्हायग्राची गोळी दिली. या प्रकरणी पीडित तरुणीने बॉसविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. बंगळुरुतील जलाहालीमध्ये ही घटना घडली.
पीडित तरुणी जलाहाली येथील एका फायनान्स कंपनीत डाटा प्रोसेसर म्हणून काम करते. मागच्या वर्षभरापासून ती इथे काम करत आहे. पीडित तरुणीने मॅनेजर मलप्पा विरोधात तक्रार दाखल केली आहे. मागच्या तीन-चार महिन्यापासून मलप्पा लैंगिक सुखासाठी आपला छळ करत होता असा आरोप तिने केला आहे.
कोणी कार्यालयात नसताना मलप्पा माझ्या ड्रेसची ओढणी खेचायचा, मला अयोग्य पद्धतीने स्पर्श करायचा असे या तरुणीने पीनया पोलिस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर मलप्पाने मला लग्नाचाही प्रस्ताव दिला होता.
मलप्पा विवाहीत असून त्याची पत्नी अमेरिकेत रहाते. माझ्याकडे काही पर्याय नव्हता. त्यामुळे मला मलप्पाचा त्रास सहन करावा लागत होता. मी जर त्याच्याविरोधात तक्रार केली असती तर, कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नसता. उलट मलाच नोकरीवरुन काढून टाकले असते. त्याने अनेकवेळा माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती असा आरोप पीडित तरुणीने केला आहे.