दोन महिन्यांपासुन पगार न मिळाल्याने नगरपरिषद कर्मचा-यांचे दि.१० मार्च २०१७ रोजी राज्यभर बोंबाबोंब आंदोलन.

महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद कर्मचा-यांचे सहाय्यक वेतन अनुदान वेळेवर न मिळाल्याने गेल्या दोन महिन्यांपासुन कर्मचा-यांना पगार न मिळाल्याने दि.१० मार्च २०१७ रोजी राज्यभर बोंबाबोंब आंदोलन.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदेच्या कर्मचा-यांना दरमहाच्या दरमहा वेतन वेळेवर व्हावे म्हणुन ६ वा वेतन लागु करत असताना जकात व महागाई भत्ता अनुदान बंद करुन सहाय्यक वेतन अनुदान देण्यास मंजुरी दिलेली होती. त्याप्रमाणे नगरपरिषदांना सहाय्यक वेतन अनुदान दिले जात होते. परंतु गेल्या वर्षापासुन शासनाकडुन सहाय्यक वेतन अनुदान वेळेवर नगरपरिषदांना न मिळाल्याने नगरपरिषद कर्मचा-यांचे मासिक वेतन दोन-दोन, तीन-तीन महिने होत नसल्याने राज्यात सर्व नगरपरिषद कर्मचा-यांमध्ये संताप व्यक्त केला जात असल्याने वेतन वेळेवर दरमहाच्या दरमहा व्हावे म्हणुन दि.१० मार्च २०१७ रोजी राज्यभर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचे राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर यांनी सांगितले.
            शासन सध्या सर्व कामकाजाचे डिजीटलाईझेशन करत असुन ऑनलाईन सेवा देण्याबाबत आग्रही आहे. त्यानुसार मध्यंतरीच्या काळात शासनाकडुन सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम ऑनलाईन प्रत्येक नगरपरिषदेच्या खात्यावर जमा केली जात होती. परंतु सध्या सदर सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उशीरा पाठविली जाते. तेथुन सर्व नगरपरिषदांना सदरची रक्कम वितरीत केली जाते. यावेळी मा.आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरळी मुंबई यांच्या मुळ सहीची प्रत मुंबई समक्ष जावुन आणल्याशिवाय व ती प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व कोषागार कार्यालयाकडे दिल्याशिवाय सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम नगरपरिषदेकडे वर्ग केली जात नाही. त्यामुळे कोषागार कार्यालयाकडुन नगरपरिषदांना सहाय्यक वेतन अनुदान वेळेवर दिले जात नाही. या वेळ खावु प्रक्रीयेमुळे नगरपरिषद कर्मचारी वेतन, सेवानिवृत्त कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती वेतन वेळेवर होत नाही. यामुळे कर्मचारी वेतनापासुन वंचित राहतात व वेतनासाठी तीन-तीन महिने वाट पहावी लागते. त्यामुळे पुर्वीप्रमाणे सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम प्रत्येक नगरपरिषदेच्या खात्यावर दर महाच्या १ तारखेला ऑनलाईन जमा करावी अशी मागणी करण्यात येत आहे व या सर्व बाबींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.१० मार्च २०१७ रोजी सकाळी ११ वाजता राज्यातील सर्व नगरपरिषद कर्मचारी नगरपरिषदेसमोर बोंबाबोंब (शिमगा) आंदोलन करणार आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *