पोलिस पाटलांना शस्त्र देणार

7 May. 2017

ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांची माहिती
गुन्हे दाखल असलेल्यांना शस्त्र मिळणार नाही
पुणे – गावात दरोडा पडला किंवा चोरी झाली, तर पोलीस पाटील त्यांच्याकडील शस्त्राच्या सहाय्याने दरोडेखोर, गुन्हेगारांना पळवून लावू शकतात. गावातील गुन्हेगारीवर आळा आणण्यासाठी पुणे ग्रामीणच्या हद्दीतील प्रत्येक गावातील पोलीस पाटील यांना पुणे ग्रामीण पोलिसांकडून शस्त्र परवाना देण्यात येणार आहे. शस्त्र हे प्रत्येक पोलीस पाटील यांनी घ्यायचे आहे. यामध्ये त्यांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी माहिती दिली.

पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यातील दुवा म्हणजे पोलीस पाटील. गावातील गुन्हा तसेच गुन्हेगारीबद्दलची इतर महत्वाची माहितीही त्यांना असते. बऱ्याच वेळात गावात दरोडा, चोरी असे गुन्हे घडतात. ते गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तो पोलिसांना मदतही करत असतो. तसेच त्याला या कामासाठी शासकीय पगारही मिळत असतो. तो शासनाचा माणूस असून त्याच्यावर कायद्यानेही काही जबाबदाऱ्या निश्‍चित केल्या आहेत. त्यांना या शस्त्रपरवाना देण्यात यावा, असा प्रस्ताव तत्कालीन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक व सध्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी मांडला होता. मात्र तो प्रस्ताव प्रत्यक्षात येण्याआधीच त्यांची बदली झाल्याने तो बारगळला. मात्र तो प्रस्ताव येत्या दोन महिन्यांत मार्गी लागेल, अशी माहिती अधीक्षक हक यांनी दिली. हा परवाना देण्यासाठी प्रत्येक पोलीस पाटील यांचे आवशक ती कागदपत्रे तपासली जाणार आहेत. यामध्ये जर कोणावर गुन्हे दाखल असले, तर त्यांना परवाना देण्यात येणार नाही.
गावात एखादा गुन्हा घडल्यास त्याबाबतची थोडीफार माहिती ग्रामस्थांना असते. परंतु ती माहिती पोलीसांपर्यंत पोचत नाही. म्हणून ग्रामस्थांचे गुन्हे शोधण्याच्या बाबतीत समावेश असणे महत्वाची ठरते. ग्रामस्थांचा सहभाग वाढवण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून प्रत्येक गावात दक्ष ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात येणार आहे. यामध्ये त्या गावातील तरूण, पोलीस पाटील व इतर नागरिकांचा सहभाग असेल. त्यांना ओळखपत्रही देण्यात येणार आहे. यासाठी काही प्रमाणात त्यांना निधीही देण्यात येणार असून अनेक ग्रामपंचायतींमध्ये तंटामुक्तीचा फंड तसाच पडून आहे. त्यातुन खर्च केला जाणार आहे, अशी माहिती अधीक्षक सुवेझ हक यांनी दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *