👁 13 Views

संत सोपानदेवांच्या भूमीत यापुढे दारूबंदी

वघापूर- संत सोपानदेवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत यापुढे कोणत्याही प्रकारची दारूविक्री केली जाणार नाही, अथवा कोणत्याही प्रकारचे समर्थन केले जाणार नाही. तर यापुढे कायमस्वरूपी पूर्णपणे दारूविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. असा निर्णय आज (दि. 11) रोजी झालेल्या सासवड नगर पालिकेच्या सभेत घेण्यात आला. नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यामुळे आतापर्यंत सुरु असलेल्या चर्चेला पूर्णपणे पूर्णविराम मिळाला आहे.
मंगळवारी (दि. 2) झालेल्या सभेत नगरपालिकेच्या हद्दीत असलेले राज्य व केंद्रीय शासनाचे मार्ग नगर पालिकेच्या ताब्यात घेण्याचा ठराव झाला होता. सासवड शहरातील नागरिकांना रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज या मूलभूत सोयी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. पालखी महामार्ग सासवड शहराचे हद्दीतून जात असून यामुळे सासवड शहराचे दोन भाग झाले आहेत. यामुळे महामार्गाच्या पलिकडे मूलभूत सोयी पुरविता येत नाहीत. संबंधित विभाग लवकर परवानगी देत नाही हे अनुभवल्या नंतर हा निर्णय घेण्यात आला होता. असे स्पष्टीकरण नगरपालिका प्रशासनाने त्यानंतर लगेच दिले होते.
मात्र, दारूधंदे सुरू राहावेत यासाठी हा निर्णय घेतल्याचा गैसमज करून घेण्यात आला. विविध सामाजिक संघटना, महिला यांनी नापसंती व्यक्‍त केली होती. तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. उदयकुमार जगताप यांच्यासह नगरपालिकेतील विरोधी पक्षाचे नगरसेवक दीपक टकले, मंगल म्हेत्रे, सचिन भोंगळे, डॉ. अस्मिता रणपिसे यांनी ही या निर्णय विरोधात प्रसिद्धी माध्यमांकडे प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर व्यसनमुक्‍ती आंदोलनाचे प्रणेते हभप बंडामहाराज कराडकर यांनीही नगरपालिकेचे नगराध्यक्ष भोंडे आणि मुख्याधिकारी विनोद जळक यांना लगेचच पत्र पाठवून या ठरावाबाबतचे स्पष्टीकरण मागितले होते. दारूबंदी करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यामुळे सर्वत्र याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
सासवड नगर परिषदेत जनमत विकास आघाडीचे बहुमत आहे, सोपानकाकांच्या भूमीत नगरपरिषदेने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे असे या आघाडीचे नेते व जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी सांगितले. मात्र, दारू धंद्यांसाठी महामार्ग ताब्यात घेणार असा समज पसरविण्यात आला. त्यामुळे जनमताचा रेटा लक्षात घेऊन तसेच नगरसेवक – नगरसेविका आणि नागरिक यांच्या भावना लक्षात घेऊन नगरपरिषदेने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दारूबंदी ठराव करणारी भारतातील ही पहिली नगरपालिका आहे. याचे अनुकरण इतर नगरपालिकांनी करावे, असे आवाहनही जगताप यांनी केले आहे.
तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्याचा ठराव या बैठकीत मजूर करण्यात आला. सासवड शहरामध्ये प्लास्टिक बंदी व फेल्क्‍सबंदी करण्याचा निर्णय यापूर्वीच नगरपरिषदेने घेतला आहे, दि. 20 मे पासून प्रशासनाने या निर्णयाची काटेकोर करावी, असेही ठरविण्यात आले. सासवड पोलीस स्टेशनच्या विनंतीनुसार शहरातील विविध चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरपरिषद व लोकसहभागातून ही सोय उपलब्ध करणार आहे. सासवडच्या स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसविण्यात येईल, यासाठी नगरपालिकेचा निधी न वापरता अनुदान मिळवून खर्च करण्यात येईल. याबरोबरच नगरपालिकेची, चतुर्थ वार्षिक कर आकारणी, 2017 – 18 करता वार्षिक निविदा मागविणे, विविध विकासकांना मुदतवाढ घेणे, सासवड शहरातील सिमेंटच्या जुन्या पाइपलाइन बदलणे, नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत फर्निचर करणे, शहरातील अतिक्रमणे काढून टाकणे आदी विषयांनाही या सभेत मजुरी देण्यात आली.
याप्रसंगी मुख्याधिकारी विनोद जळक, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विजय वढणे, गटनेत्या आनंदीकाकी जगताप, नगरसेवक अजित जगताप, सुहास लांडगे, मनोहर जगताप, संदीप जगताप, संजय ग. जगताप, प्रवीण भोंडे, दीपक टकले, सचिन भोंगळे, गणेश जगताप, दिनेश भिंताडे, नगरसेविका पुष्पा जगताप, निर्मला जगताप, वसुधा आनंदे, सारिका हिवरकर, सीमा भोंगळे, विद्या टिळेकर, माया जगताप, मंगल म्हेत्रे, डॉ अस्मिता रणपिसे उपस्थित होते.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र ना. जगताप, शहराध्यक्ष साकेत जगताप, शेखर वढणे, ऍड. विश्वास पानसे आदी कार्यकर्ते नगरपालिकेच्या महामार्ग ताब्यात घेतल्याने दारू धंद्यांस प्रोत्साहन मिळेल म्हणून हा ठराव रद्द करावा, या मागणीसाठी नगरपालिकेत आले होते. नगरपालिकेने दारूबंदीचा ठराव केल्याचे त्यांना समजल्यावर राजेंद्र जगताप, साकेत जगताप यांनी नगरपरिषदेचे अभिनंदन केले. नगरपरिषदेने संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक व जनहिताचा निर्णय घेतला म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता झुरंगे, शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष सागर जगताप, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत टिळेकर, तसेच मराठा महासंघ यांनी नगरपालिकेचे अभिनंदन केले. विजय वढणे यांनी आभार मानले.
महामार्गावरील तोडलेल्या वृक्षाची पुन्हा लागवड केली नाही, विजेचे खांब दुरुस्त केले नाहीत, अशी अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे महामार्ग ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. दारूबंदी बरोबरच शहरातील अवैध धंदे, मावा-गुटखा बंद करण्याबाबत नगरपालिका आग्रही असल्याचे मार्तंड भोंडे यांनी सांगितले.
यापुढे ना हरकत प्रमाणपत्र देणार नाही -भोंडे
प्रशासनाने केलेल्या ठराबाबतचा गैरसमज दूर व्हावा, तसेच नगर पालिकेचा चांगला दृष्टिकोन असल्याचे समजावे म्हणून नगरपरिषदेने नगर पालिका हद्दीत दारूबंदी करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. त्यामुळे यापुढे दारू दुकाने, मावा यासाठी नगर पालिका कोणत्याही प्रकरचा ना हरकत दाखला देणार नाही अथवा परवानगी परवानगी देणार नाही, असे नगराध्यक्ष भोंडे यांनी स्पष्ट केले. त्याबरोबरच स्थानिक नागरिकांना सुविधा मिळाव्यात यासाठी यापूर्वी राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग नगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात आलेल्या ठरावाबाबत कायम आहोत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *