बालविकास अधिकाऱ्यांचे चातुर्य
कोरेगाव भीमा, दि. 15 (वार्ताहर) -बालविकास अधिकाऱ्यांच्या चातुर्याने व पोलिसांच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीचा नकुशी (नाव बदललेले आहे) हिचा विवाह रोखण्यास यश मिळाले आहे. एका दूरध्वनीवरून मिळालेल्या माहितीद्वारे बाल विवाह प्रकल्प अधिकारी यांनी शतप्रतिशत प्रयत्न केले. विविध आघाडीवर संगती करत ठोस पुरावे गोळा करून हा बालविवाह होणार असल्याचे पटवून दिले. त्यानंतर पोलिसांनी विवाह रोखण्यास मदत केली.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की, पुणे सोलापूर रस्त्यावरील हडपसर येथील एका मंगल कार्यालयात सनई चौघडा वाजत होता. वऱ्हाडी मंडळी थाटात उपस्थित होती. येथील फुले वसाहतमधील राहणाऱ्या 16 वर्षीय मुलीचे बोपखेल येथील मुलाशी सायंकाळी 5ः30 वाजता विवाह होणार होता. घड्याळीचा काटा पुढे सरकत होता, कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरु होते. प्रारंभी मुलीची जन्मतारीख शोधणे गरजेचे होते. यासाठी अंगणवाडी गाठण्यात आली. तेथील रजिस्टरमध्ये मुलीचा 2001 मध्ये जन्म झाल्याची नोंद मिळाली. मात्र तोपर्यंत मुलीच्या वडिलांनी महापालिकेचा जन्माचा दाखल सादर केला. त्यामध्ये जन्म साल 1998 लिहिलेले होते. इकडे कार्यकर्त्यांनी मुलीच्या आई – वडिलांच्या लग्नाचे फोटो मिळविले. त्या फोटोच्या पाठीमागे 1999 हे लग्नाची तारीख मिळाली. लग्नाचे आधीच मुलीचा जन्म झाला कसा असा प्रश्न उपस्थित झाला.
लग्नाची तारीख, अंगणवाडी रजिस्टरमधील जन्मतारीख असे भक्कम पुरावे सादर करून पोलीस निरीक्षक फुगे यांच्याकडे महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी रोहिणी ढवळे, मुख्य सेविका स्वाती परांडे, ऍड. असुंता पारधे यांनी आग्रह धरला. पण त्यांनी टाळाटाळ केली मग ढवळे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी विष्णू पवार यांची भेट घेऊन वस्तूस्थिती सांगितली. यानंतर पवार यांनी सर्व संबंधित यांच्याबरोबर चर्चा केली. तरीही दाद देईनात नंतर त्यांनी पोलिसी धाक दाखवून हा बाल विवाह रोखण्यात आला. पोलिसांनी मुलीचे (वय 18) वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करू नये, अशी नोटीस बजावली. त्यामुळे हा विवाह रोखण्यात आला असून एका अल्पवयीनचे आयुष्य ही बचावले आहे.
प्रारंभी आम्ही खूप प्रयत्न केले पण पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. संबंधित मुलीचे 18 वर्ष पूर्ण असल्याची खोटी कागदपत्रे सादर केल्यानंतर वरील पोलिसांनी कार्यवाही केली. एका अल्पवयीन मुलीचा विवाह थांबविल्याचे समाधान मिळाले.
– रोहिणी ढवळे, मुख्य बालविवाह अधिकारी, समाज कल्याण विभाग
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




