👁 8 Views

विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारततर्फे शैक्षणिक, सामाजिक व अध्यात्माच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या पंचकन्यांना ‘पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर…!

पुणे, ता. १६ : विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाचे औचित्य साधून, शैक्षणिक, सामाजिक आणि अध्यात्माचा समन्वयातून आयुष्यभर समाजप्रबोधन व सांप्रदायिक सद्भावनेचे कार्य, समर्पित भावनेने करून, समाजासमोर आदर्श निर्माण करणार्‍या ज्येष्ठ साहित्यिका व लेखिका डॉ. माधवी वैद्य (पुणे), थोर समाजसेविका व शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. जोस्क बुंडर्स (द नेदरलँडस्), नामवंत शिक्षणतज्ञ व अध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणार्‍या डॉ. मेहेर मास्टर मूस (मुंबई), थोर समाजसेविका व वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉ. सौ. ज्योत्स्ना अशोक कुकडे (लातूर) व ज्येष्ठ समाजसेविका व भारूडकार सौ. चंदाताई जगदीश तिवाडी (पंढरपूर, जि.सोलापूर) या पंचकन्यांना “पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार”जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवार, दि. २३ मे २०१७ रोजी, सकाळी १०.३० वा. रामेश्‍वर (रूई), ता.जि. लातूर येथे संपन्न होणार आहे.
या पंचकन्यांबरोबरच पाथर्डी, अहमदनगर येथील थोर समाजसेविका श्रीमती कौसल्याताई कोंडीबा ढाकणे यांना ‘‘ विशेष समर्पित जीवनगौरव पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.
सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक व रोख रु. ११,०००/- (रुपये अकरा हजार) असे या पुरस्काराचे स्वरुप आहे, अशी माहिती विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी दिली.
पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड या भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या सेवेत अत्यंत श्रद्धा, निष्ठा व भक्तिमय असे व्रतस्थ आणि समर्पित जीवन जगल्या. त्यांच्या कार्यापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, हा या पुरस्कार देण्यामागचा हेतू आहे.
पुरस्कारार्थींचा अल्पसा परिचय खालीलप्रमाणे-
डॉ. माधवी वैद्य, जेष्ठ साहित्यिक, लेखिका व समीक्षक आणि माजी अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. साहित्य परिषदेच्या शंभर वर्षाच्या इतिहासामध्ये त्या पहिल्या महिलाध्यक्षा ठरल्या आहेत. त्यांनी मराठीतील १३ नामवंत कवीच्या कवितांवर दूरदर्शनसाठी मालिकेचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. वेगवेगळ्या फुलांच्या रसाचा/अंशाचा वापर करून अनेक प्रकारचे आजार कमी करता येतात यासाठी पुष्पौषधी या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे.

प्रा. डॉ. जोस्क बुंडर्स, संचालिका, बायोलॉजी अँड सोसायटी, अ‍ॅमस्टरडॅम युनिव्हर्सिटी, द नेदरलँडस् – प्रा. डॉ. जोस्क बुंडर्स या सोसायटी फॅकल्टी ऑफ अर्थ अ‍ॅण्ड लाईफ सायन्सेस, अ‍ॅथेना इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन इन्व्होवेशन, कम्युनिकेशन इन हेल्थ अ‍ॅण्ड लाईफ सायन्सेस अशा क्षेत्रात कार्यरत आहेत. आंतरशाखीय संशोधनावर त्यांचा विशेष भर आहे. त्यांच्या संशोधनाचा विविध स्वयंसेवी संस्थांना व समाजाला उपयोग होत आहे.
डॉ. मेहेर मास्टर मूस, अध्यक्ष, झोरास्ट्रियन कॉलेज, मुंबई – मुंबई येथील झोरास्ट्रियन कॉलेजच्या त्या अध्यक्षा आहेत. त्या २००४ पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष सल्लागार पदी आहेत. आंतरधर्मीय संवाद व शांततेसाठी त्या कार्यरत आहेत. सर्व धर्मांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे.
डॉ. सौ. ज्योत्स्ना अशोक कुकडे, थोर समाजसेविका, लातूर – डॉ. सौ. ज्योत्स्ना अशोक कुकडे या स्त्रीभ्रूणहत्या व लिंग समभाव जाणीव जागृती, व्यक्तिमत्व विकसन, सरोगसी, तृतीयपंथीय व समलिंग समस्यांबरोबरच कॅन्सरग्रस्त महिलांसाठी संवेदना या मंचाच्या माध्यमातून लोकजागृती करीत आहेत. लातूर येथील स्वामी विवेकानंद हॉस्पिटलच्या माध्यमातून कार्यरत आहेत.
सौ. चंदाताई जगदीश तिवाडी, ज्येष्ठ समाजसेविका व भारुडकार, पंढरपूर, जि.सोलापूर -१९८२ पासून सौ. चंदाताई तिवाडी भारुडाच्या माध्यामातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. सोबतच आपल्या प्रभावी शैलीतून त्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर सामाजिक, आध्यात्मिक व राष्ट्रीय कार्य करीत आहेत.
अहमदनगर येथील थोर समाजसेविका श्रीमती कौसल्याताई कोंडीबा ढाकणे यांनी पतीचे अकाली निधन झाले असतानाही, अतिशय व्रतस्थपणे जीवन जगून आपल्या मुलांना उच्चशिक्षण दिले आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन, त्यांची दोन्ही मुले आज उच्च पदावर कार्यरत आहेत. .

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *