👁 10 Views

डॉ. द.ता. भोसले वाचनालयाचे पुरस्कार जाहीर… डॉ. देशमुख, मरकड, विभुते, दुधाळ ठरले मानकरी

पंढरपूर लाईव्ह वृत्त दि. 20 मे 2017
इसबावी ता. पंढरपूर येथील डॉ. द.ता. भोसले सार्वजनिक वाचनालय व जिव्हाळा सेवाभावी संस्था यांच्या वतीने देण्यात येणार्‍या साहित्य व साहित्य सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये डॉ. सदानंद देशमुख, गणेश मरकड,, सुभाष विभुते, कल्पना दुधाळ हे मानकरी ठरले असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष कल्याण शिंदे यांनी दिली.
डॉ. द.ता. भोसले सार्वजनिक वाचनालय व जिव्हाळा सेवाभावी संस्था यांच्या वतीने दरवर्षी साहित्य व साहित्य सेवा पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीचा साहित्य व साहित्य सेवा पुरस्कार डॉ. सदानंद देशमुख यांच्या चारीमेरा या कादंबरीस जाहीर झाला आहे. डॉ. दानंद देशमुख हे शेतकरी आणि शेतकर्‍यांचे जागतिकीकरणात होणार्‍या परिणामावर आधारीत लेखन करत असतात. जानेफळ (ता. मेहकर, जि. बुलढाणा) येथील शेतकरी कुटुंबातील देशमुख यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

दुसरा पुरस्कार गणेश मरकड यांच्या गावाला सोबत घेऊन जाताना या कविता संग्रहास जाहीर झाला आहे. गणेश मरकड हे जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तिसरा पुरस्कार कल्पना दुधाळ यांच्या धग असतेच आसपास या कविता संग्रहास जाहीर झाला आहे. शेतकरी कुटुंबातील असलेल्या कल्पना दुधाळ यांची कविता मुंबई व सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाली आहे. साहित्य अकादमी जोधपूरच्या संमेलनात त्यांचा गौरव झाला आहे. साहित्य सेवा पुरस्कार आजरा (जि.कोल्हापूर) येथील सुभाष विभुते यांना जाहीर झाला आहे. लहान मुलांसाठी ॠग्वेद मासिकाच्या माध्यमातून अनेक उपक्रम, व्याख्यानमाला राबविल्या आहेत.

प्रत्येकी 11 हजार 111 रोख, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. दि. 3 जुन रोजी सायंकाळी 5 वाजता संत तनपुरे मंगलधाम येथे सातारचे डॉ.आ.ह. साळुंखे व माजी आ.उल्हासदादा पवार, पुणे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमास ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे, जेष्ठ साहित्यीक डॉ. द.ता. भोसले उपस्थित राहणार असल्याची माहिती अध्यक्ष कल्याण शिंदे यांनी दिली. यावेळी निवड कमिटीचे सदस्य प्रा.डॉ. देवानंद सोनटक्के, प्रा.डॉ. राजाराम राठोड, कवी प्रशांत वेळापूरे, प्रा.भास्कर बंगाळे, प्रा.धनाजी चव्हाण, जिव्हाळा परिवाराचे अध्यक्ष अ‍ॅड.भारत भोसले, विलास भोसले आदी उपस्थित होते.

सदर पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी साहित्यप्रेमी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.द.ता. भोसले सार्वजनिक वाचनालय व जिव्हाळा परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *