महापालिकेचा इशारा : दुकाने थाटणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे
पुणे – रस्त्यांवर दुकाने मांडून खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांवर आता फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिकेचा परवाना असलेल्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणे हा सध्या शहरासाठी कळीचा मुद्दा आहे. याविषयावर महापालिका मुख्यसभेतही अनेकदा चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळेच रस्ते आणि पदपथावरील अतिक्रमणे काढण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागातर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. बांधकाम खाते आणि अतिक्रमण विभाग एकत्रित कारवाई करणार आहे.
शहरातील प्रमुख 153 चौक आणि 45 रस्त्यांवर हातगाडी, फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांना बंदी आहे. असे असतानाही या रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी आहे. त्यात, महापालिकेच्या पथ विक्रेता धोरणानुसार रस्त्यावर म्हणजे, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. तरीही बहुतेक रस्त्यांवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली असून, रात्री उशिरापर्यंत ती सुरू ठेवण्यात येतात.
या व्यावसायिकांनी पदपथावर अतिक्रमणे केली आहेत. त्याठिकाणी ग्राहक आणि त्यांच्या वाहनांमुळे पादचाऱ्यांची गैरसोय होते. या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर प्राधान्याने आणि नियमित कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी अतिक्रमण विभागाला दिला आहे. या व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावा, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.
शहरात सर्वत्र अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. त्यात, विशेषत: खाद्यपदार्थ व्यावसायिकांवर कारवाई केली जाईल. नियमांकडे दुर्लक्ष करून खाद्यपदार्थ तयार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर नियोजन केले असून, अतिरिक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सलग महिनाभर कारवाई सुरू राहील.
संध्या गागरे, नियंत्रण विभाग प्रमुख, अतिक्रमण
…त्यांच्यावरही कारवाई
राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार शहरातील 20 हजार पथारी, हातगाडी आत्रर स्टॉलधारकांना परवाने देण्यात आले आहे. त्यापैकी 14 हजार व्यावसायिकांना त्यांचे वाटप झाले आहे. मात्र, परवानाधारकांना दिलेल्या जागेपेक्षा अधिक जागेचा ते वापर करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे परवानाधारकांवर कारवाई होणार आहे. त्यानंतर अधिक जागेचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर सतत नजर ठेवण्यात येईल, असेही गागरे यांनी स्पष्ट केले.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





