बाजारात दूध व भाजीपाला आणू नये असे आवाहन संपकऱ्यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माळशिरस, मोहोळ, माढा, उत्तर सोलापूर आदी भागात शेतकरी रस्त्यावर उतरले असून दूध व शेतमाल रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध करत आहेत.
राज्य सरकारशी मंगळवारी झालेली अंतिम टप्प्यातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आजपासून होणारा शेतकरी संप अधिक तीव्र करण्याचा निर्धार किसान क्रांती समन्वयकांनी केला आहे. आज प्रामुख्याने नगर, नाशिक जिल्ह्य़ांतील दूधसंकलन बंद राहणार असून बाजार समित्यांचे कामकाजही बंद ठेवण्यात आले आहे. बाजारात दूध व भाजीपाला आणू नये असे आवाहन संपकऱ्यांनी केले असून त्याला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. परिणामी मुंबई, पुणे आदी प्रमुख शहारांतील दूध व भाजीपाल्याच्या पुरवठय़ावर विपरीत परिणाम होणार असून शुक्रवारपासून दूध, भाजीपाल्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
कर्जमाफी, कृषिमालास हमीभाव यासह विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारपासून पुकारण्यात आलेला संप यशस्वी करण्यासाठी किसान क्रांती समन्वयकांनी कंबर कसली आहे. मध्यरात्रीपासून भाजीपाला, दूध व शेतात उत्पादित कोणताही माल शहरात जाऊ न देण्याचा निर्धार गावोगावी करण्यात आला आहे. दैनंदिन गरजेच्या कृषिमालाची कोंडी करण्यासाठी शहराकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर पथकांची खास नजर ठेवली जाईल. शहरांकडे जाणाऱ्या महामार्गावर कृषिमालाची वाहतूक करणाऱ्यांना रोखण्याचा इशारा काही शेतकऱ्यांनी दिला आहे.
संपाला खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, रघुनाथदादा पाटीलप्रणीत शेतकरी संघटना, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना, बाबा आढाव यांची हमाल मापाडी संघटना यांसह ४२ संघटनांनी पाठिंबा जाहीर केला. शिवसेना व मनसेने संपाला पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्याची धार आणखीच वाढली. संपाला दूधवाहतूक संघटना, दूधसंकलकांनी पाठिंबा दिला आहे. राज्यातील सुमारे २५० बाजार समित्यांचे कामकाज बंद करण्याचा प्रयत्न आहे. बाजार समिती संघाचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप मोहिते यांनी १ जूनपासून समित्यांचे कामकाज बंद राहील असे जाहीर केले. त्यामुळे जिल्हय़ातील सर्व बाजार समित्या बंद राहणार आहेत.
Pandharpur LIVE UPDATES:
३.३०: कोल्हापुरात बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्री होत असलेल्या वस्तू दिल्या फेकून
३.१५: कोल्हापुरात रघुनाथदादा पाटील यांचे समर्थक जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष अॅड. माणिक शिंदे व सहकारी आक्रमक. बाजार समितीमधील शेती माल विक्री बंद पाडण्याचा प्रयत्न.
३.००: संप मिटेपर्यंत स्वाभिमानीचा दूध संघ बंद – खासदार राजू शेट्टी
२.४५: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संपाला पाठिंबा
२.१५: श्रीगोद्यांत २५ शेतकऱ्यांवर दरोड्याचे गुन्हे
२.००: शेतकऱ्यांना संप मागे घेण्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे आवाहन
१.३०: संगमनेर बाजारसमितीसमोर शेतकऱ्यांचे आंदोलन
१.१५: शेतकऱ्यांच्या संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांचा संप ही राज्यकर्त्यांसाठी शरमेची बाब आहे. राज्यकर्त्यांनी अंर्तमुख होऊन विचार करावा. हा संप म्हणजे अराजकतेची सुरूवात आहे- खासदार राजू शेट्टी
१.१०: अनगर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे शेतकरी संपामुळे आठवडी बाजार पूर्णपणे ठप्प होता.
१.०५: शिर्डी-खिर्डीगणेश येथे शेतमालाचा टेम्पो जाळला
१२.५५: निफाडजवळ नैताळे येथे शेतकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीमार
१२.४५: उस्मानाबादमधील भूमचा बाजार शेतकऱ्यांनी बंद पाडला
१२.३५: राज्यातील अनेक दूध संकलन केंद्रांवर संपामुळे दूध संकलन नाही.
१२.२५: बारामतीतही आजचा आठवडा बाजार बंद
१२.१५: धुळ्यातील सर्व आठवडीबाजार बंद
१२.०५: लासलगावात बाजारपेठा ठप्प, कांदा लिलाव बंद
११.५५: शिऊर येथील शेतकऱ्यांनी वैजापूर मार्गावर दूध फेकले११.३०: शेतकरी संपाला औरंगाबादेत गालबोट. संपादरम्यान गजानन देशमुख या तरूणाला व्यापाऱ्याकडून मारहाण. अन्नदाता शेतकरी संघटनेचे नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनाही मारहाण.
११.१०: औरंगाबाद बाजार समितीत शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये वादावादी
११.००: येवला-कोपरगावदरम्यान टोलनाक्यावर शेतकऱ्यांनी आंबे, भाजीपाला रस्त्यावर फेकला
१०.५०: जळगाव बाजार समितीत भाजीपाल्याची आवक ४० टक्क्यांनी घटली.
१०.५०: कासेगावाजवळील वडजी गावात शेतकऱ्यांनी रस्त्यावर फुले टाकून आंदोलनाला केली सुरुवात
१०.४०: उमदी (जि. सांगली) येथील शेतकऱ्यांनी शहरी भागात जाणारा शेतीमाल अडवून धरला.
१०.३०: निफाडमध्ये २७ शेतकरी पोलिसांच्या ताब्यात
१०.२०: करमाळा (जि. सोलापूर) दूध आणि कांदा रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध.
१०.१०: नांदेड येथे नागपूर महामार्गावर भाजीपाला-दूध फेकून शेतकऱ्यांचा संप सुरू
१०.००: मंगेवाडी (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथे दूध रस्त्यावर ओतले.
९. ४५: सोलापूर येथील बाजार समितीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत फुलं देऊन ट्रकचालकांना संपात सहभागी होण्याचे आवाहन
९.३०: उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतले९.२०:
९.१०: नाशिक, नगर, साताऱ्यातील आठवडा बाजार बंद
८.५०: संगमनेरजवळ शेतकऱ्यांनी २५ गाड्या रोखून धरल्या.
८.४०: नवी मुंबईतील वाशी बाजारसमितीत ५०० ट्रक शेतमालाची आवक
८.३०: पुणे बाजारसमितीत ५० टक्केच शेतमालाची आवक
८.२५: श्रीहरी अणेंचा शेतकरी संपाला पाठिंबा- टीव्ही वृत्त
८.१०: लासलगाव येथे आठ शेतकरी पोलिसांच्या ताब्यात
८.०५: सातारा-पुणे महामार्गावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला.
८.००: मनमाड टोल नाक्यावर भाजी रस्त्यावर फेकून आंदोलन
७. ५५: साताऱ्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास दुधाच्या दोन टँकरच्या काचा फोडण्यात आल्या.
७.४५: नगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतले.
७.३०: नाशिकसह मनमाड बाजार समितीत शुकशुकाट
७.२०: शिर्डीत दूध ओतून शेतकऱ्यांचे आंदोलन
७. १०: पुणे-बंगळुरू महामार्गावर शेतकरी संघटनेने ट्रक अडवले





