नगर: शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी संपाच्या सहाव्या दिवशीही जिल्हाभर पडसाद उमटले. शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्यासाठी आंदोलकांनी गर्दी केली होती. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे दुधाचा टँकर व फुलांचा टेम्पो अडवणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी गेलेले पोलिस व आंदोलकांत चकमक होऊन पोलिसांवर दगडफेक झाली. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. नगर शहरात मंगळवारच्या आठवडे बाजारात अल्प प्रमाणात भाजीपाला आला. तो खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती.
शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी १ जूनपासून संपाचे हत्यार उपसले असून सहाव्या दिवशीही जिल्हाभर गोंधळाची स्थिती कायम होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पभूधारकांसाठी कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी सरसकट कर्जमाफीवर आंदोलक शेतकरी ठाम आहेत. सोमवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. मंगळवारी शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्याचे आंदोलन करण्यात आले. पोलिस व आंदोलकांत ठिकठिकाणी संघर्ष झाला. नगर तहसील कार्यालयात सकाळीच आंदोलक अनोख्या पद्धतीने पोहोचले. टाळ, मृदुंग हाती घेऊन भजनाच्या सुरात आंदोलकांनी तहसील कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न होत असताना पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना रोखले. यावेळी तहसीलदार सुधीर पाटील यांना टाळे दाखवून निवेदन देण्यात आले.
माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी नेवासे तहसील कार्यालयाकडे धाव घेतली होती. मोठ्या संख्येने उपस्थित आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. पोलिसांनी आंदोलकांना रोखल्यानंतर तहसील कार्यालयासमोरच ठिय्या मांडण्यात आला. तहसील कार्यालयाला टाळे ठोकून प्रशासनालाही बांगड्यांचा आहेर देण्यात आला, तसेच तेथे भाजीपाला टाकण्यात आला. सोनईच्या तलाठी कार्यालयालाही आंदोलकांनी टाळे ठोकले. राहुरी पंचायत समिती, कृषी विभागाच्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात आले. राहुरीत शेतकऱ्यांनी दूध व कांदे रस्त्यावर फेकले. शेवगाव तालुक्यातही शासकीय कार्यालयांचे प्रवेशद्वार बंद करून निदर्शने करण्यात आले.
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे मंगळवारी मध्यरात्री मुंबईच्या दिशेने दूध घेऊन जाणारा टँकर आंदोलकांनी अडवला. टँकरचे कुलूप तोडून दूध रस्त्यावर सोडण्यात आले. झेंडूची फुले घेऊन जाणारा टेम्पोही अडवण्यात आला. टेम्पोतील फुले रस्त्यावर फेकण्यात आली. आंदोलकांना थाेपवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आक्रमक जमावाने दगडफेक केली. त्यात दोन पोलिस जखमी झाले. पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला.
अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथे टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक अडवून रस्त्यावर टोमॅटो फेकण्यात आले. दोन दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यात दुधाचा टँकर पेटवून दिल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेले गंभीर गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराबाहेर सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातून ३०७ कलम मागे घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
नगर शहरात मंगळवारी आठवडे बाजार भरला होता. बाजारात नेहमीपेक्षा भाजीपाल्याची आवक कमी असली, तरी सर्वप्रकारच्या भाज्या उपलब्ध होत्या. या भाज्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली. नगर बाजार समितीत सरासरीच्या तुलनेत पन्नास टक्के भाजीपाल्याची आवक झाली. संप सुरू झाल्यापासूनची ही सर्वात मोठी आवक मानली जात आहे. फळाच्या आवकेतही मोठी घट झाली. बाजार समितीत बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रत्येक घडामोडीवर पोलिसांची करडी नजर आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





