पंढरपूर नगरपरिषदेस २ ऑक्टोबर २०१४ नंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची उपलब्धता, स्वच्छता याबाबत केलेल्या विशेष प्रयत्नांची दखल घेवुन केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडु यांच्या शुभहस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह निर्माण राज्य मंत्री प्रकाश मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरुपात पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांना प्रशस्तिपत्र देण्यात आले. या प्रसंगी मुख्याधिकारी अभिजीत बापट, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले हे उपस्थित होते.
२ ऑक्टोबर २०१४ पासुन देशात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये मार्च २०१६ मध्ये पंढरपूर नगरपरिषदेने शहर हागणदारीमुक्त जाहिर केले आहे. केंद्र शासनातर्फे नेमण्यात आलेल्या क्वालिटी काऊंन्सिल ऑफ इंडिया (QCI) त्रयस्थ तपासणी समितीमार्फत यावर्षी सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता याच्या केलेल्या पाहणीत पंढरपूर नगरपरिषदेची कामगिरी उल्लेखनीय असल्याने तसेच दैनंदिन व यात्रा कालावधीतील शौचालयांची उपलब्धता असल्यामुळे पंढरपूर नगरपरिषदेस सदरचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. शहर स्वच्छते बरोबरच या वर्षी प्रधानमंत्री आवास योजना, शहरी बेघरांसाठी निवारा, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान या केंद्र शासनाच्या योजनाही नगरपरिषदेमार्फत राबविल्या जाणार आहेत. तसेच शहर कचरामुक्त होण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे टाटा कन्सल्टन्सी इंजिनिअर (TCE) यांची पंढरपूर नगरपरिषदेसाठी प्रकल्प सल्लागार म्हणुन निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रोत्साहनपर गौरव करण्यात आलेला असुन प्रशस्तिपत्र देण्यात आलेले आहे असे नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांनी सांगितले.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





