👁 11 Views

पंढरपूर तालुक्यातून शेती कर्जमाफीचे 25 हजार अर्ज मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार 10 जुनपासून शेतकर्‍यांकडून फॉर्म भरून घेण्याची मोहिम: संभाजीराजे शिंदे

पंढरपूर: प्रतिनिधी
मी कर्जमुक्त होणारच असा निर्धार करून शिवसेनेने शेतकर्‍यांकडून कर्जमुक्ती मागणीचे फॉर्म गोळा करण्याचे अभियान हाती घेतले आहे. पंढरपूर तालुक्यात 10 जुन पासून या अभियानाचा शुभारंभ होत असून 25 हजार शेतकर्‍यांचे कर्जमुक्तीचे फॉर्म भरून घेऊन ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांनी दिली. 
राज्यात शेतकर्‍यांचे कर्जमुक्ती आणि हमीभावाचे आंदोलन जोरात सुरू आहे. या आंदोलनात आता सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेनाही थेटपणे सहभागी होत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना मोठा राजकीय आधार मिळणार असून शेतकर्‍यांचे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्यावतीने कर्जमुक्तीची मागणी सुरूवातीपासूनच करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेने नाशिक येथील अधिवेशनानंतर राज्यभरातून शेतकर्‍यांकडून कर्जमुक्तीची मागणी करणारे फॉर्म शेतकर्‍यांकडून भरून घेण्याची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेची अंमलबजावणी पंढरपूर तालुक्यातही करण्यात येणार आहे. 
पंढरपूर तालुक्यातूनही किमान 25 हजार शेतकर्‍यांचे कर्जमुक्ती मागणीचे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. आणि हे फॉर्म शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वांना पाठवण्यात येणार आहेत. 10 जुन रोजी सकाळी 11 वाजता येथील शासकीय विश्रामगृह येथून या मोहिमेला सुरूवात होणार आहे. सेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, जेष्ठ सेना नेते साईनाथ अभंगराव, ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. बी.पी. रोंगे, शिवसेनेचे पंढरपूर, मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ निरीक्षक संतोष माने, महावीर देशमुख, महेश साठे, पंढरपूर शहर प्रमुख संदीप केंदळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर गावो-गावी जाऊन शिवसैनिकांमार्फत भरून घेतले जाणार आहेत. या फॉर्ममध्ये शेतीविषयक 12 प्रश्‍न विचारण्यात आलेले असून त्यानंतर शेतकर्‍यांची व्यक्तीगत शेती, कर्जविषयक माहितीही भरून घेतली जाणार आहे. तसेच या कर्जमुक्ती फार्मचे संकलन करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे सर्व फॉर्म पाठवण्यात येणार आहेत. 
पंढरपूर तालुक्यातही शेतकर्‍यांचे आंदोलन जोमात सुरू असून आता या आंदोलनात कर्जमुक्तीच्या निमित्ताने शिवसेनाही थेटपणे उतरत असल्यामुळे तालुक्यात हे आंदोलन आणखी जोर पकडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


==================================


25 हजार शेतकर्‍यांकडून फॉर्म भरून घेणार


पंढरपूर तालुक्यातील 25 हजार शेतकर्‍यांचे कर्जमुक्तीचे फॉर्म भरून घेण्याचे उद्दीष्ट असून 10 जुनपासून या मोहिमेचा शुभारंभ होत आहे. शिवसैनिकांकडून गावोगावी जाऊन हे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत आणि ते पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्याहस्ते मुख्यमंत्र्यांना दिले जाणार आहेत. तेव्हा 10 जुन रोजी तालुक्यातील शेतकरी, आजी-माजी पदाधिकारी तसेच शिवसेनाप्रणीत सर्व संघटनांच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी शासकीय विश्रामगृह येथे सकाळी 10 वाजता उपस्थित रहावे

-संभाजीराजे शिंदे,
शिवसेना, पंढरपूर तालुका प्रमुख

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *