विपुलचा सुरत येथे हिरे दलालीचा व्यवसाय होता; मात्र नोटाबंदीनंतर या व्यवसायाला जबर फटका बसला.
गुजरातचा व्यापारी अटकेत, तीन किलो सोने हस्तगत
नोटाबंदीनंतर हिरे व्यापार मंदावल्याने पोटापाण्यासाठी सोन्याच्या तस्करीत उतरलेल्या गुजरातच्या तरुणाला हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) मंगळवारी रात्री मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. विपुलकुमार नथुभाई(३३) असे या त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ३.१३२ किलो सोने हस्तगत करण्यात आले. दुबई विमानतळावरील शुल्क मुक्त (डय़ुटी फ्री) दुकानातून दारूची बाटली विकत घेऊन तिच्यात त्याने चिकटपट्टीच्या साहाय्याने सोन्याची २७ बिस्किटे ठेवली होती. हस्तगत केलेल्या सोन्याची किंमत ९५ लाख असल्याचे सांगण्यात आले.
विपुलचा सुरत येथे हिरे दलालीचा व्यवसाय होता; मात्र नोटाबंदीनंतर या व्यवसायाला जबर फटका बसला. त्यामुळे पैसे कमावण्यासाठी हा मार्ग अवलंबल्याचे त्याने सांगितले. एआययूने केलेल्या चौकशीतून विपुल पहिल्यांदाच दुबईला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
एआययूने दिलेल्या माहितीनुसार विपुलने दुबई विमानतळावरील शुल्कमुक्त (डय़ुटी फ्री) दुकानातून ‘जीम बीम’ नावाची दारू विकत घेतली. बाटलीसोबतच्या खोक्यात सुमारे दहा तोळे वजनाची २७ सोन्याची बिस्कीटे चिकटपट्टीने चिकटवली. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर येथील शुल्कमुक्त दुकानातून त्याने व्हाईन विकत घेतली. इथल्या दुकानातून व्हाईनसोबत प्लास्टीकची पिशवी विपुलला देण्यात आली. या पिशवीत त्याने व्हाईन आणि सोने दडवलेली दारूची बाटली ठेवली. अनेकदा मुंबई विमानतळावरील अशा दुकानातून विकत घेतलेल्या वस्तूंची तपासणी केली जात नाही.
कारण विमानतळावरच वस्तू विकत घेऊन त्यात सोने, अंमलीपदार्थ वा अन्य वस्तू दडवणे सोपे नाही. असे केल्यास संबंधीत प्रवाशाबाबत संशय निर्माण होऊ शकतो. तसेच काही दिवसांपूर्वी संशयावरून मुंबई विमानतळावरून विकत घेतलेल्या दारूच्या बाटल्याचंी बॅगेज स्कॅनिंग मशीनद्वारे तपासणी करण्यात आली होती. तेव्हा बाटल्या फुटल्या आणि प्रवाशांचे नुकसान झाले होते. याची कल्पना विपुलला होती. त्यामुळे मुद्दामून त्याने मुंबई विमानतळावरून व्हाईनची बाटली विकत घेतली.
आगमन कक्षात आल्यानंतर विपुलची केशरचना आणि त्याने घातलेले भडक रंगाचे कपडे यावरून एआययू अधिकाऱ्यांचा संशय बळावला. सोनेवा अन्य वस्तूंची तस्करी करताना वाहक( कॅरिअर) ओळख पटवण्यासाठी उलटा भांग पाडून, भडक रंगाचे कपडे घालून साथीदारांना ओळख पटवण्यासाठी संकेत देत असतात. विपुलनेही तेच केले होते. ताब्यात घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याची बॅग तपासली; मात्र त्यात काहीच नव्हते. अधिकाऱ्यांनी सहजच त्याच्या हातातील पिशवीतली दारूची बाटली तपासली. त्यात सोने आढळले. विुपलला अटक करण्यात आली असून हे सोने त्याने कोणाच्या सांगण्यावरून आणले याबाबत चौकशी व तपास सुरू असल्याचे एआययूच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





