👁 10 Views

मायमराठी आपणच जपावी : पुष्कर श्रोत्री

 ‘हसवाफसवी’ जिव्हाळ्याचा विषय
 तभाला सदिच्छा भेट 
नागपूर, २६ जून
मराठी शब्दांचा स्पष्ट आणि शुद्ध उच्चार करण्यावर भर देण्याचा मी प्रयत्न करतो. मराठीत चांगले पर्यायी शब्द उपलब्ध असताना उगीच इंग्रजी शब्दांचा वापर करायला मला आवडत नाही. ‘घेऊ या ब्रेक’ पेक्षा ‘घेऊ या विश्रांती’ आणि ‘कॅच यू सून’ पेक्षा ‘लगेच परत येतोय’ ही वाक्ये जास्त आपली वाटतात. मग त्यांचा वापर करायला काय हरकत आहे? शेवटी आपली ‘माय’मराठी आपल्यालाच जपायची आहे, असे मत अभिनेता-दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री यांनी व्यक्त केले. नागपुरात एका नाटकाच्या प्रयोगासाठी आले असताना त्यांनी दै. तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी दै. तरुण भारतचे प्रबंध संचालक धनंजय बापट आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुहीकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
पटकथा लेखक-दिग्दर्शक-निर्माता अशा तिहेरी भूमिकेत असलेल्या पुष्कर यांचा ‘उबुंटु’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्याबाबत बोलताना पुष्कर म्हणाले की, ‘उबुंटु’ हा झुलू भाषेतील शब्द असून, नेल्सन मंडेला यांच्यामुळे तो जगाला माहिती झाला. त्या शब्दाचा अर्थ ‘मी आहे कारण आपण सगळे आहोत’ असा आहे. कोणत्याही व्यक्तीचे अस्तित्व सोबतच्या सर्वांसोबत आणि त्यांच्यामुळेच असते, असा ‘उंबुंटु’चा अर्थ आहे. कोकण आणि सांगलीत चित्रीकरण झालेल्या या चित्रपटात दहा बालकलाकारांनी अभिनय केला आहे. त्यांची शाळा बंद पडू नये, यासाठी ही मुले काय धाडस करतात? याचा प्रवास म्हणजे ‘उबुंटु’ हा चित्रपट होय. पुणे आणि नाशिक चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखविण्यात आला असून, त्याला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे यातील सर्व बालकलाकार नवोदित असून, त्यांना अभिनयाचे प्रशिक्षण खुद्द पुष्करनेच दिले आहे. ‘अभिनय करताना एखादी भावना प्रत्यक्ष अनुभवत असल्याचा विचार केल्यास आपोआपच चेहर्‍यावर तसे भाव येतात. या चित्रपटातील बालकलाकारांना रडण्यासाठी ग्लिसरिनचा वापर करावा लागला नाही, हेच प्रशिक्षणाचे यश आहे. काही जणांना चित्रपट महोत्सवात पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले आहे,’ असेही पुष्कर यांनी कौतुकाने सांगितले. अभिनेता झालो नसतो तर नक्कीच जंगल आणि वन्यप्राण्यांसाठी काही करण्याचा छंद जोपासला असता, असेही त्यांनी सांगितले.
दिलीप प्रभावळकरांच्या लेखणीतून साकारलेला आणि तमाम मराठीजनांच्या हृदयास हात घालणारा ‘हसवाफसवी’ हा नाट्यप्रयोग सध्या पुष्कर श्रोत्री साकारत आहेत. ‘एकाच नाट्यप्रयोगात सहा भूमिका साकारण्याचा हा अफलातून प्रयोग दिलीप प्रभावळकरांसारख्या कसलेल्या अभिनेत्याने एका उंचीवर नेऊन ठेवला. तो पुन्हा सादर करण्यासाठी अनेकांनी त्यांच्याकडे परवानगी मागितली. मात्र, त्यांनी कोणाचीच निवड केली नाही. नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुळकर्णी यांनी त्यांना पुष्कर ही भूमिका साकारणार असल्याचे सांगितल्यावर मात्र त्यांनी होकार दिला. हे नाटक करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी साहजिकच मला चांगलाच तणाव जाणवत होता. पण, चंद्रकांत कुळकर्णी यांनी प्रभावळकरांनी फक्त माझ्याच नावावर शिक्कामोर्तब करून विश्‍वास दाखवल्याचे सांगितल्यावर मी पुन्हा एकदा नाटक नीट वाचून दिलीप प्रभावळकरांना भेटायला गेलो. नाटक कसे करू? म्हणून विचारल्यावर ते म्हणाले, ‘तू तुझ्या शैलीत आणि स्वतंत्र अभिनय कर!’ मग माझी हिंमत वाढली आणि १९९० मध्ये लिहिलेल्या ‘हसवाफसवी’च्या लिखाणात मी काळानुरूप बदल केले, संवादात आणि वेशभूषेतही काही प्रमाणात बदल केले. पण, माझी ‘हसवाफसवी’ प्रेक्षकांनी उचलून धरली. आता मी या नाटकाचे देशविदेशात अडीचशेपेक्षा जास्त प्रयोग केले आहेत. प्रयोगानंतर अनेकजण भेटायला येऊन नाटक आवडल्याचे सांगतात. विशेष म्हणजे मी मूळ नाटकाची ‘कॉपी’ करत नसल्याचे ते आवर्जून नमूद करतात.’
१९९२ मध्ये अशोक सराफ यांच्यासोबत रंगभूमीवर ‘हसत खेळत’ हे पहिले व्यावसायिक नाटक करणार्‍या पुष्कर श्रोत्री यांनी रंगभूमीवरील आपली २५ वर्षे पूर्ण केली आहेत. दै. तरुण भारतचे संपादक श्याम पेठकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या ‘शकुंतला एक्सप्रेस’ या कथेवर त्याच नावाचा चित्रपट हा पुष्कर यांचा दिग्दर्शक म्हणून आगामी चित्रपट असणार आहे. अभिनेता ते दिग्दर्शक-निर्माता असा प्रवास करणार्‍या या हरहुन्नरी कलाकाराला तभा परिवारातर्फे शुभेच्छा!

 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *