👁 11 Views

पेट्रोलपंपावर धाड

‘मापातले पाप’ उघड
– दोन यंत्रांना सील ठोकले 
नागपूर, २६ जून
ठाणे येथील गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मानकापूर परिसरातील फरस गेटसमोर असलेल्या एका पेट्रोलपंपावर धाड घालून दोन मशिन्सना सील ठोकले. या पेट्रोलपंपावर मापात पाप केले जात असल्याची खबर मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांनी पेट्रोलियम कंपन्यांच्या मदतीने ही कारवाई केल्याने नागपुरात खळबळ माजली आहे. या कारवाईने मापात पाप करणारे इतर पेट्रोलपंपवाले धास्तावले आहेत.
इंडियन ऑईल कंपनीचा हा पेट्रोलपंप आहे. रबज्योत ऑटोमोबाईल नावाच्या या पेट्रोलपंपावर नेहमीच कमी पेट्रोल देण्यात येते, अशी ग्राहकांची ओरड होती. ही माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला समजताच त्यांनी धाडीची योजना आखली. सोबत त्यांनी इंडियन, भारत आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या अधिकार्‍यांना घेतले. ठाणे पोलिसांनी सोमवारी सकाळीच या पेट्रोलपंपावर धाड घातली.
या पेट्रोलपंपावरील दोन मशिन्सची तपासणी करण्यात आली. एका मशिनमधून ५ लिटर पेट्रोल काढण्यात आले. त्यापैकी २०० मिली पेट्रोल कमी भरले. दुसर्‍या मशिनमधून पुन्हा ५ लिटर पेट्रोल काढले असता, त्यातूनही २२० मिली पेट्रोल कमी आले. त्यामुळे या पेट्रोलपंपावर लबाडी होत असल्याचे सिद्ध झाले. ठाणे आणि इतर शहरांप्रमाणेच माइक्रोचीपच्या मदतीने ही चोरी करण्यात येत होती.
विशेष म्हणजे ऑईल कंपनीच्या नियमाप्रमाणे प्रत्येक ५ लिटरमागे ५ ते २५ मिली फरक मान्य आहे. परंतु, एवढा फरक आढळल्याने सर्रास चोरी करण्यात येत होती, हे ऑईल कंपनीच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आले. यावरून नागपुरातदेखील पेट्रोलपंपांवरून ग्राहकांना कमी पेट्रोल आणि डिझेल देण्यात येते, हे सिद्ध झाले आहे. पोलिसांनी दोन्ही मशिन्स सील केल्या. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, राज्यातील सात जिल्ह्यांमधील ४४ पेट्रोलपंपांवर धाडी टाकण्यात आल्या आणि त्यापैकी ३० पेट्रोलपंपांवरील लबाडी उघडकीस आली. येत्या काही दिवसांत आणखी कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.
ठाणे पोलिसांची कारवाई का?
पेट्रोलपंपाच्या मशिनला पल्सर नावाची चीप लावून देण्याचे काम करणार्‍या विवेक शेट्टी नावाच्या आरोपीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. चौकशीदरम्यान ठाण्यातीलच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील पेट्रोलपंपांची नावे आरोपीकडून समोर आली होती. या माहितीच्याच आधारे ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पोलिस महासंचालकांच्या आदेशान्वये राज्यभराप्रमाणेच नागपुरातही ही कारवाई केली.


 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *