👁 12 Views

मराठीच्या अाधी तेलुगू भाषेत रचले गेले पांडुरंग माहात्म्य, तेनाली राम यांची रचना

पुणे- संस्कृत आणि मराठी भाषेत रचली गेलेली श्री पांडुरंगाचे स्तवन करणारी माहात्म्ये उपलब्ध आहेत, मात्र दक्षिणेकडील तेलुगू भाषेतही पांडुरंग माहात्म्य लिहिले गेले आहे आणि मुख्य म्हणजे तेलुगू पांडुरंग माहात्म्य मराठी भाषेतील माहात्म्याच्या आधी लिहिले गेल्याचे सिद्ध झाले आहे. दक्षिण भारतात सुपरिचित असणाऱ्या तेनाली राम या विद्वानाने हे तेलुगू पांडुरंग माहात्म्य रचले आहे.


हस्तलिखितांचे ज्येष्ठ अभ्यासक वा. ल. मंजूळ यांनी ही माहिती दिली. तेनाली राम या तेलुगू विद्वानाने तेलुगू भाषेत पांडुरंग माहात्म्य लिहिले असून, ते साडेचारशे वर्षांपूर्वीचे आहे, त्यामुळे मराठी पांडुरंग माहात्म्याच्याही ते पूर्वीचे असल्याने ते अधिक महत्त्वाचे आहे. मराठी कवी श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी मराठी भाषेत पांडुरंग माहात्म्य रचले तो काळ इ. स. १६९० ते १७२० दरम्यानचा आहे. मात्र तेनाली राम यांनी रचलेले तेलुगू पांडुरंग माहात्म्य त्यापूर्वी शंभर वर्षे जुने आहे, असे मंजूळ यांनी स्पष्ट केले. तेनाली रामरचित माहात्म्याचा काळ इ. स. १५६५ चा आहे.
इतिहासकारांनी तेनाली राम यांचा काळ इ. स. १५०५ ते १५८० असा निश्चित केला आहे, असेही ते म्हणाले.


अकबर-बिरबल, कालिदास – भोज राजा यांच्या चातुर्यकथा जशा प्रसिद्ध आहेत, तशाच कथा तेनाली राम यांच्याही विख्यात आहेत. आजवर जी पांडुरंग माहात्म्ये उपलब्ध आहेत, त्यात संस्कृतमधील तीन, पौराणिक स्कंद, पद्म आणि विष्णू पुराणातील ही माहात्म्ये आहेत. मराठी भाषेत श्रीधर नाझरेकर, प्रल्हाद महाराज बडवे आणि गोपाळबोधो माहात्म्य प्रसिद्ध आहे. आणखीही काही माहात्म्ये आहेत.


संस्कृत भाषेतील पंचमहाकाव्यांप्रमाणेच तेलुगू भाषेतही पाच महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक महाकाव्य म्हणून तेनाली राम यांच्या ‘पांडुरंग माहात्म्य्यनु’या रचनेचा उल्लेख केला जातो. तेनाली राम यांचे माहात्म्य स्कंद पुराणावर आधारीत आहे. या काव्याचे पाच आश्वास (अध्याय) आहेत.


मराठी -तेलुगूतही भेद
मराठी आणि तेलुगूमधील माहात्म्यामध्ये काही भेदही सापडतात, असे निरीक्षण मंजूळ यांनी नोंदवले आहे. त्यामुळे मराठी अभ्यासकांनी तेलुगू भाषेतील या पांडुरंग माहात्म्याचा सखोल अभ्यास केल्यास त्यातून अनेक नव्या गोष्टींवर प्रकाश पडेल तसेच पांडुरंग या दैवताची व्याप्ती दक्षिणेकडे कशा प्रकारे होती, यासंबंधीही नवी माहिती मिळू शकेल, असे ते म्हणाले.


तेलुगू माहात्म्याचे पाच अध्याय
– स्कंद पुराणातील कथानकावर आधारीत
– शिव-पार्वती संवादातून पांडुरंग माहात्म्याचे कथानक उलगडते
– दक्षिणतीरी पौंडरिक क्षेत्र असल्याचा उल्लेख
– दक्षिणेकडे हे महाकाव्या भाविकांच्या पठणाचा भाग
– मराठी अभ्यासकांचे मात्र दुर्लक्ष

 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *