👁 12 Views

माउलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात

नातेपुते (जि. सोलापूर) : सातारा जिल्ह्यातील बरड येथून निघालेल्या माउलींच्या पालखीने बुधवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. जिल्ह्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या धर्मपुरी येथे माउलींचे जंगी स्वागत झाले. माउलींचा नातेपुतेमध्ये मुक्काम आहे. उद्या गुरुवारी सकाळी माळशिरसकडे रवाना होत असून पुरंदावडे येथे पहिले गोल रिंगण होणार आहे.
सकाळी ६ वाजता माउलींची पालखी बरड विश्रांती तळावरून निघाली. सकाळी ९ वाजता साधुबुवाचा ओढा येथील मंदिरात विसावा घेऊन धर्मपुरी कॅनॉलकडे मार्गस्थ झाली. तिथे दुपारचे भोजन घेऊन शिंगणापूर फाटा (पानसकर वाडी) येथे दुपारचा विसावा घेतला.
सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत धर्मपुरी येथे सोहळ्याचे आगमन होताच पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार हणमंतराव डोळस, आमदार रामहरी रुपनवर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक विरेश प्रभू आदींनी स्वागत केले. पालखीसोबत असलेले विश्वस्त, चोपदार, मानकरी यांच्यासह अनेकांचे स्वागत नारळ-पान देऊन आणि फेटा बांधून जंगी स्वागत केले.
तुकोबांच्या पालखीचे बावड्यात शाही स्वागत
बावडा (पुणे) : टाळमृदंगाच्या गजरात व पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करीत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचे बावड्यात आगमन होताच भाविक ग्रामस्थांनी तोफांच्या सलामीत शाही स्वागत केले.
‘‘वारकरी पंढरीचा
धन्य धन्य जन्म त्याचा’’
इंदापुरातून विठ्ठलवाडी, वडापुरी, रामवाडी, सुरवड, वकीलवस्ती इ. गावांचा पाहुणचार स्वीकारीत पालखी दुपारी येथे दाखल झाली. त्या वेळी ग्रामस्थांनी वेशीवर पुष्पहार अर्पण करून तोफांची सलामी दिली. श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कृषी दिंडी काढली होती. त्यामध्ये मुलामुलींनी वारकऱ्यांची वेषभूषा केली होती. टाळमृदंगाच्या गजरात विठूनामाचा जयघोष व डोक्यावर तुळशी वृंदावन यामुळे विद्यार्थी दिंडी अधिक तेजोमय दिसत होती.
पालखी रथ ब्रह्मर्षी हरिभाऊ तोरणे गुरुजी चौकात येताच दर्शनासाठी झुंबड उडाली. त्यानंतर पालखी रथातून उतरवून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व ग्रामस्थांनी खांद्यावरून बाजारतळ प्रांगणापर्यंत वाहिली. रत्नाई निवासस्थानी वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
निवृत्तीनाथांच्या पालखीचे सोलापुरात स्वागत-
करमाळा (जि. सोलापूर) : श्री क्षेत्र त्रिंबकेश्वर (जि. नाशिक) येथून निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे बुधवारी सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत करण्यात आले. सर्वांत पुढे चौघडा, त्यामागे अश्व व दिंड्या त्यानंतर निवृत्तीनाथांचा फुलांनी सजवलेला रथ आणि त्यामागे दिंड्यांचा दळभार, टाळ, मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष, अशा उत्साही व भक्तिमय वातावरणात शेगुड येथे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर आला.
पहाटे निवृत्तीनाथांची विधीवत पूजा व आरती करण्यात आली. सकाळच्या न्याहरीसाठी सोहळा आंबीजळगाव येथे पोहोचला. त्यानंतर सोहळा सोलापूर जिल्ह्यात रावगाव (ता. करमाळा) येथे पोहोचला. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार संजय पवार यांनी स्वागत केले. सोहळा गुरुवारी सकाळी करमाळा येथे येणार असून, जेऊर येथे मुक्कामी असणार आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *