👁 13 Views

पंढरपूर आषाढी वारी २०१७ सुरक्षित व स्वच्छ तऱ्हेने पार पडावी याकरिता आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांचा राज्य शासनाकडे पाठपुरावा

२९ जून २०१७
पुणे, ता. २८ : दिनांक ११ जून २०१७ रोजी पंढरपूर येथे चंद्रभागेच्या पात्रातील वाळूच्या बेसुमार उपशामुळे तयार झालेल्या पाण्यात तयार झालेल्या या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने धीरज अप्पा जुमाळे (८),श्रीपाद सुनील शहापुरकर (६), गणेश सिद्धप्पा जुमाळे (८) आणि सौरभ अनिल शहापुरकार (६) ही चार अल्पवयीन मुले मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली होती. या मुलांच्या कुटुंबियांना शासकीय स्तरावरून आर्थिक मदत मिळावी यासाठी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे महसूलमंत्री मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा केली. याबाबत त्यांनी त्वरीत दाखल घेऊन या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत देण्यासंदर्भात सूचना दिल्या असून मदतीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तांकडून आ. डॉ. गोऱ्हे यांना दिनांक २८ जून रोजी पुणे येथील  बैठकीत देण्यात आली आहे.  याचबरोबर शिवसेनेच्या वतीने त्यांनी या कुटुंबियांना प्रत्येकी १०,००० रुपयांची मदत आज दिली. यावेळी त्यांच्यासमवेत शिवव्यापारी सेनेचे पुणे शहर प्रमुख आनंद गोयल हे देखील उपस्थित होते. चंद्रभागेच्या पात्रात अजूनही वाळू उपसा सुरु आहे ही बाब प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शासकीय कॉटेज रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली असता तिथे अनेक गोष्टींमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आलेले आहे. वार्डमधील स्वच्छता,ऑक्सिजन सिलिंडरचा पुरेसा पुरवठा, रिक्त पदांची भरती करणे यावर त्वरीत कार्यवाही व्हावी. तसेच येथे डॉक्टर्सची पदे तात्पुरत्या स्वरूपात वारीच्या निमित्ताने भरण्यात आलेली असल्याने कायमस्वरूपी डॉक्टर्स नेमणे जरुरी आहे. रुग्णालयात आणखी वातानुकुलीत कक्षांची गरज त्यांनी व्यक्त केली. रुग्णालयाच्या पातळीवर स्थानिक नागरिकांच्या समावेशातून रुग्ण हक्क समिती स्थापन करण्यात यावी. या रुग्णालयाला रुग्णवाहिका आवश्यक असल्याने याबाबत एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून चालविण्यास तयार असल्यास याकरिता आमदार निधीतून मदत करता येऊ शकेल. प्रशासनाने चंद्रभागेच्या तीरावर आपत्ती निवारण कक्ष उभारावा अशी सूचना केली.
तसेच पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी अनेक कामे प्रस्तावित करण्यात आलेली असून वारीनंतर लगेच चंद्रभागेच्या घाटाचे बांधकाम सुरु करण्यात येणार आहे. याकरिता निविदा काढण्यात आलेल्या आहेत अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांना दिली.
 ‘वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले असून जबाबदार प्रशासकीय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सर्व कामांवर देखरेख ठेवून आहेत.  वारीच्या काळात पंढरपूर शहरात संपूर्ण स्वच्छतेवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष राहणार आहे. तसेच या संपूर्ण काळात विजेचे लोड शेडींग होणार नाही’ अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. वारीची पूर्वतयारीची पाहणी त्यांनी करून वारक-या शी चर्चा केली असता वारकरी समाधानी असल्याचे दिसून आले.  ६५ एकर परिसरात उभारलेल्या सुविधांची पाहणी त्यांनी केली.
मंदिर विकासासाठी विधीमंडळाच्या सुमारे ५० आमदारांनी प्रत्येकी 5 लाख निधी दिलेला होता. या निधीचा हिशोब आजवर मंदिर प्रशासनाकडून आलेला नाही. याबाबत सूचना केली. शेगाव, शिर्डी येथील अन्नछत्र चालते या धर्तीवर पंढरपूर मंदिरातही दररोज सुमारे ५०,००० भाविकांना अन्नदान करण्याची व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वारीच्या काळात आणि उपासाच्या दिवशी ते बंद ठेवू नये. पंढरपूरमधील स्थानिक भाविकांना देवाला नैवेद्य दाखविण्याकरिता मंदिराद्वारे एकत्रित सुविधा उपलब्ध करून द्यावी. आ. डॉ. गोऱ्हे यांच्या सूचनेनुसार एकादशीच्या दिवशी वारकऱ्यांचा उपास असतो ही बाब ध्यानात ठेवून मंदिर समिती भाविकांना बुंदीच्या लाडवाऐवजी राजगिरा लाडू प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे.
पंढरपूर शहरात नगरपालिकेकडे बांधून तयार असलेल्या लॉकर्स असलेल्या खोल्या त्वरीत भाविकांना उपलब्ध करून द्याव्यात तसेच याबाबत भाविकांमध्ये जनजागृती करावी अशा सूचना विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. यावेळी वारीमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने साफसफाई साठी मानवी हस्तक्षेप करावा लागणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या जेंव्हा थांबतील तेंव्हा शिवसेना समाधानी असेल असे प्रतिपादन त्यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नावर सांगितले. शेतकरी प्रश्नावर आभाळ फाटल्याची भावना व्यक्त करताना जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने त्यांना काही गरज पडली तर शिवसेना सुई दोरा उपलब्ध करून देईल असा टोला त्यांनी आज सरकारला दिला. शेतकरी प्रश्नावर मी चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेणार आहे असे त्यांनी सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *