👁 15 Views

जीवनाचे खरे सार सुख-दुःखाच्या चक्रात दडलेले आहे बाबा महाराज सातारकर यांचे वाखरी येथे प्रवचन

पुणे, दि. ३ जुलै : “वारकरी हा पांडुरंगाला समर्पित झाला तर त्याला चांगले आशिर्वाद मिळतात. त्यामुळे वारकर्‍यांनी प्रापंचिक अवस्थेतून परमार्थाकडे वळावे. ज्यावेळेस ही प्रापंचिक अवस्था संपते त्यावेळेस भक्ती-भावही आपोआप निर्माण होतो. जीवनाचे खरे सार हे सुख-दुःखाच्या चक्रात दडलेले आहे. टोकाचे दुःख भोगल्यावरच मानवाला सुखाची किंमत कळते. खरे म्हणजे त्याने अशा वेळी तटस्थपणे राहिले पाहिजे.” असे मार्गदर्शन बाबा महाराज सातारकर यांनी वारकर्‍यांना केले.
विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत, श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर विकास समिती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वाखरी, पंढरपूर येथे पालखी तळाच्या शेजारी, विश्‍वशांती गुरूकुल परिसरातील “पूर्णब्रह्म योगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड अन्नपूर्णा सदन” येथे आयोजित प्रवचनात ते बोलत होते.
 यावेळेस विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व श्रीक्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा.कराड, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ.रमेश ठाकरे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, प्रगतीशील शेतकरी काशीराम दा. कराड, रूई रामेश्‍वरचे माजी सरपंच तुळशीराम दा. कराड, बापूसाहेब मोरे देहूकर, डॉ.सुचित्रा कराड-नागरे, स्वाती कराड- चाटे, लातूर येथील माईर्स एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक रमेशअप्पा कराड, डॉ. हणमंत कराड, सौ. उर्मिला विश्‍वनाथ कराड व सौ. उषा विश्‍वनाथ कराड हे उपस्थित होते.
बाबा महाराज सातारकर म्हणाले,“जो सदगुणांचे अर्जन करतो, त्याला अर्जुन असे संबोधले जाते. त्यामुळे वारकर्‍यानी पाऊलो पाऊली चांगल्या गुणांचे आचरण करीत रहावे. पंढरीची वारी फक्त एकट्याने नाही तर सोबत सर्वाना घेऊन करावी. व्यसन म्हणजे मागे खेचणे असा अर्थ होतो. त्यामुळे  वाईट व्यसन सोडण्यासाठी सदगुणांचे व्यसन अंगिकारावे. जिथे प्रभू प्रेम असते तेथे वारी असते. त्यामुळे प्रत्येकांने वारीत सक्रिय सहभाग घ्यावा. संत हे चालती फिरती ज्ञानेश्‍वरी असते. या सृष्टीवर संतांनी मानवाला सांभाळले आहे. त्यामुळे संताच्या चरणी जीवन अर्पित करावे. ”
“छत आणि छत्री ज्या प्रकारे सावली देते तसेच संपूर्ण वारकर्‍यांना माऊली सावली देते. त्यामुळे वारकरी संप्रदायाची साथ कधीही सोडू नका. प्रत्येकाच्या घरात एक खंबीर व्यक्ती असली, की त्याच्या आधाराने सर्वांच्या जीवनाला आधार मिळतो. तसेच, वारकर्‍यांच्या मागे पांडुरंग उभा असल्यामुळे त्याच्या जीवनाला आधार आहे. प्रत्येकाने वारीचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा.”.
प्रा. डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “वारकरी संप्रदाय हा भाग्यशाली आहे. संतासारख्या विभूतीमुळे आमचे जीवन सुखमय झाले आहे. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून विश्‍व शांतीचे कार्य करण्याची प्रेरणा पांडुरंगामुळे मिळते. धर्म म्हणजे स्वत:चे कर्तव्य बजावणे. अध्यात्म म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आदि दुर्गुणांना दूर ठेवण्याचा मार्ग आहे. स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्यानुसार २१व्या शतकात भारत ज्ञानाचे दालन म्हणून विश्‍वात उद्यास येईल. त्यात वारकर्‍यांची प्रमुख भूमिका असेल.”
यावेळी पांडुरंगाची आरती बाबा महाराज सातारकर, डॉ.विश्‍वनाथ कराड, डॉ.पठाण, डॉ. रमेश ठाकरे, तुळशीराम कराड, काशीराम कराड यांच्या हस्ते झाली.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

 
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *