👁 116 Views

Pandharpur : आ. समाधान आवताडे यांनी केली चंद्रभागेच्या पुर परिस्थितीची पाहणी

Pandharpur : आ. समाधान आवताडे यांनी केली चंद्रभागेच्या पुर परिस्थितीची पाहणी

चंद्रभागेला पूर; आमदार समाधान आवताडे यांनी घेतला पूरजन्य परिस्थितीचा आढावा

व्यास नारायण, अंबाबाई झोपडपट्टीतील ५० कुटुंबाचे सुरक्षितस्थळी स्थलांतर; प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश

पंढरपूर /प्रतिनिधी

उजनी तसेच वीर धरणातून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग १ लाखांच्यावर सुरू असल्याने चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून रविवारी शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी परिसरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून येथील ५० कुटुंबांचे उपजिल्हा रुग्णालयासमोरील रायगड भवन येथे सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.

पूरस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी रविवारी प्रशासनातील अधिकाऱ्यांसह पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली.
व्यास नारायण आणि अंबाबाई झोपडपट्टी परिसराला भेट देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला तसेच प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
याप्रसंगी प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे, मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते.

चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने सखल भागातील नागरिकांना वेळेत सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे निर्देश त्यांनी महसूल, नगर परिषद, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवून कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


नगर परिषद, महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती आमदार आवताडे यांनी दिली. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आणि चंद्रभागा नदीची वाढती पाणीपातळी लक्षात घेता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा कायम ठेवला असून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *