Ashadhi Wari 2025 : हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन, धर्मपुरी येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले पालखीचे स्वागत

Ashadhi Wari 2025 : हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन, धर्मपुरी येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले पालखीचे स्वागत

Loading

पंढरपूर दि.30 (उ.मा.का.) :- आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचे स्वागत करून माऊलीच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.

धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री श्री. गोरे यांच्यासह खासदार धैर्यशील मोहिते, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, माजी आमदार राम सातपुते, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, अमित माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माऊलीच्या पालखी स्वागतापूर्वी पालखी सोहळ्यातील नगारा व अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

पालखी स्वागतानंतर पालकमंत्री गोरे व प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधीनी हरी नामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर काही अंतर चालत गेले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सोनिया यांनी फुगडी खेळत रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष केला. तसेच पालकमंत्री महोदय व माजी आमदार राम सातपुते यांनी ही फुगडी खेळली.

सातारा प्रशासनाच्या वतीने भावपूर्ण निरोप

सोलापूर जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचे आगमन सकाळी 10.00 वाजता धर्मपुरी बंगला येथे झाले. तत्पूर्वी , सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यासणी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, फलटणचे उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी माऊलींच्या पालखीला भक्तीमय वातावरणात भावपूर्ण निरोप दिला.

जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल नामघोषाने आसमंत दुमदुमला…
टाळी वाजवावी, गुढी उभी रहावी,
वाट ती चालावी पंढरीची

या संत वचनानुसार टाळ मृदंगाचा गजर आणि मुखाने जय हरी विठ्ठल… जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा… तुकाराम चा जयघोष करीत वारकरी पालखी सोहळ्यात तल्लीन झाले होते. प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर विठ्ठलाच्या दर्शनाची आस दिसत होती. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी पंढरीचे अंतर एक एक पाऊल जवळ करीत होता.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज, वारकऱ्यांसाठी फूट मसाजची व्यवस्था

पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याला आवश्यक सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. पालखी मार्गावर स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेशी शौचालये, आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. हिरकणी कक्षाच्या माध्यमातून महिला वारकरी मंडळी तसेच लहान मुलांसाठी उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच वारकऱ्यांना पायी चालून त्रास होऊ शकतो त्यामुळे त्यांना आराम मिळावा यासाठी फूट मसाज मशीन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वारकरी भाविकांना वारीत कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे.

धर्मपुरी येथे पालखी अगमनापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आहे. यामध्ये आरोग्य शिक्षण, लेक लाडकी, पर्यावरण रक्षण, प्रदूषण मुक्ती, स्वच्छ्ता या विषयांचा प्रामुख्याने समावेश होता.

दर्शनासाठी भाविकांची गर्दी

सोलापूर जिल्ह्यातील पालखी प्रवेशानंतर माऊलींची पालखी पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृह येथे विसाव्यासाठी थांबली असता पालखीच्या दर्शनासाठी परिसरातील वारकरी भाविक व ग्रामस्थांनी अलोट गर्दी केली होती.

नातेपुते येथे पालखीचा मुक्काम

धर्मपुरी येथे विसावा घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीची पालखी नातेपुते कडे मार्गस्थ झाली.

*वारकऱ्यांसाठी विविध सुविधांचे उद्घाटन –
आषाढी वारी कालावधी ग्रामविकास विभागामार्फत धर्मपुरी येथे ग्रामविकास विभागाने वारकरी सेवा मसाज केंद्र, वैद्यकीय सेवा कक्ष, हिरकणी कक्ष, मुख्यमंत्री आरोग्य रथ, मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र, मोफत मोबाईल चार्जिंग पॉईंट, 108 ॲम्ब्युलन्स सेवांचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *