Pandharpur Live News Online : सोलापुरातील पहिले मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (वय 70, रा. मोदी) यांनी शुक्रवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास आपल्या निवासस्थानी स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली.

सकाळी पाहिलेले, बोललेले शिरीष गेले, आताच रुग्णालयात येऊन रुग्णांना पाहून गेलेले डॉ. वळसंगकर यांनी गोळ्या झाडून घेतल्याचे ऐकून सर्वांच्याच तोंडात ‘शॉकिंग’ हाच शब्द होता. आत्महत्येचे कारण अजून अस्पष्टच आहे, पण कौटुंबिक वादातून त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा आहे. सदर बझार पोलिस त्यासंदर्भातील तपास करीत आहेत.
सोलापूर शहरातील मोदी परिसरात राहणारे डॉ. शिरीष वळसंगकर (वय ६५) यांचे स्वत:चे रुग्णालय देखील आहे. शुक्रवारी त्यांनी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रुग्णालयात जाऊन अतिदक्षता विभागासह अन्य रुग्णालयांची तपासणी केली होती. अर्ध्या तासानंतर ते घरी परतले. स्वत:च्या बेडरूममध्ये पत्नी, मुलीसोबत गप्पा मारत असताना ते फोनवर बोलत असल्यासारखे करून बाथरूममध्ये गेले आणि खिशातील बंदूक काढून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली. बाथरूममधून आवाज आल्यानंतर मुलगी, पत्नी त्या ठिकाणी गेल्या. त्यावेळी डॉ. वळसंगकर यांच्या डोक्यातून एक गोळी आरपार झाली होती आणि ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अवघ्या दहा मिनिटांत त्यांना जवळच असलेल्या त्यांच्या स्वत:च्याच वळसंगकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तब्बल दोन तास आठ ते दहा डॉक्टर, विविध रुग्णालयांतील स्पेशालिस्ट देखील वळसंगकर हॉस्पिटलमध्ये आले होते. परंतु, त्यांचे शर्थीचे प्रयत्न असफल ठरले आणि डॉ. वळसंगकर यांनी जगाचा निरोप घेतला. रात्री पावणेअकराच्या सुमारास त्यांना मृत घोषित करून आयसीयूमधून बाहेर आणण्यात आले होते. त्यानंतर रुग्णालयातील स्टाफसह त्या ठिकाणी आलेल्या शेकडो लोकांना अंत्यदर्शनासाठी तेथे सोडले जात होते. उद्या (शनिवारी) त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराची पाहणी केली. त्यावेळी बाथरूममध्ये रक्त पडलेले होते, लहान पिस्तूल बाजूला पडली होती. त्यांनी स्वत:वर झाडलेल्या दोन गोळ्या देखील पोलिसांना तेथे मिळाल्या आहेत. दोन्ही गोळ्या आरपार झाल्या आहेत. पोलिसांनी रक्ताचे नमुने, बंदूक, गोळ्या (पुंगळ्या) जप्त केल्या आहेत. पोलिसांनी मोबाईल देखील जप्त केला आहे.

मृत डॉ. शिरीष वळसंगकर यांचे मोठे भाऊ सतीश हे देखील डॉक्टरच आहेत. पण, त्यांना कंपवाताचा त्रास असल्याने सध्या ते व्हीलचेअरवर असतात. डॉ. शिरीष यांची प्रकृती नाजूक झाल्यानंतर त्यांना अंतिम दर्शनासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. शर्थीचे प्रयत्न असफल ठरल्यानंतर त्यांनी डॉ. शिरीष यांचे दर्शन घेतले.

डॉ. शिरीष वळसंगकर यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते, पण गोळ्या झाडल्याने त्यांच्या शरीरातून खूप रक्त कमी झाले होते. त्यावेळी त्यांच्या नातेवाइकांनी पत्नी उमा यांना बाहेर न्यायचा प्रयत्न केला. त्यावेळी डॉ. उमा म्हणाल्या, ‘डॉ. शिरीष रुग्णालयात आहेत तोवर त्यांना डोळे भरून पाहू द्या, मी येथेच थांबते.’ त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या नातलग महिलांच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत होत्या.

डॉ. शिरीष वळसंगकर यांची सून शोनाली व मुलगा अश्विन हे दोघेही डॉक्टर आहेत. त्यांचा भाऊ, भावाचा मुलगा, त्यांची पत्नी हेही डॉक्टरच आहेत. मोदी परिसरात त्यांचे स्वत:चे रुग्णालय असून, डॉ. शिरीष वळसंगकर यांनी एक तासापूर्वी रुग्णालयात येऊन रुग्णांची तपासणी केली होती, स्टाफलाही सर्वजण बरे आहात ना, अशी विचारणा केली होती. तेच डॉक्टर, ज्यांनी शेकडो लोकांचे जीव वाचविले, अनेकांना रोजगार देऊन त्यांच्या कुटुंबांना आधार दिला, अशा रुग्णालयातील संपूर्ण स्टाफच्या डोळ्यांतून देखील अश्रू वाहत होते.
