बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावामध्ये १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सावत्र भावाने घरात कुणी नसताना अत्याचार केला. याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारीन अशी धमकी दिल्याची घटना फेब्रुवारी २०२४ ते जानेवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यादरम्यान घडली.
याबाबत बार्शी तालुका पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही शाळेत जात नसल्याने ती घरी असायची. वडील व सावत्र आई, सावत्र भाऊ हे कामाला शेतात जायचे. परंतु फेब्रुवारी महिन्यात एके दिवशी घरात कोणीच नसताना सावत्र भाऊ हा घरात आला व जबरदस्तीने पीडितेवर अत्याचार केला. तू जर कुणाला सांगितले तर जिवे मारीन अशी धमकी दिली. घाबरून तिने वडिलांना काही सांगितले नाही. परंतु तो सतत पीडितेवर अत्याचार करू लागला.
पीडित मुलगी शेवटी पोटात दुखते म्हणून आजारी पडली. परंतु तिला कोणी दवाखान्यात नेले नाही. ११ जानेवारी २०२५ रोजी पीडित मुलीची चुलत बहीण गावी आली असता ती आजारी दिसली. तिला दवाखान्यात नेले असता डॉक्टरने सांगितले या मुलीवर शारीरिक संबंध झाल्याने तिच्या पोटात दुखत आहे. त्यावेळी चुलत बहिणीने विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडलेला सर्व प्रकार बहिणीला सांगितला. त्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक जालिंदर नालकुल हे करत आहेत.