कोल्हापूर: विवाह नोंदणी संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत लग्न करण्याचे आमिष दाखवून महिलेशी शारीरिक संबंध ठेवून तिच्याकडून ११ तोळे दागिन्यांसह रोख रकमेवर भामट्याने डल्ला मारला.फिरोज निजाम शेख (रा. कॅम्प परिसर, पुणे) असे संशयिताचे नाव आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत त्याने सुमारे ११ लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद पीडित महिलेने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली आहे.
पीडित महिलेचा २०२३ मध्ये घटस्फोट झाला असून, तिला ७ वर्षांचा मुलगा आहे. मुलाला आधार मिळावा म्हणून तिने लग्नाचा निर्णय घेत एका संकेतस्थळावर स्वतःची माहिती पाठवली होती. २१ नोव्हेंबर २०२४ रोजी संशयित फिरोज शेखने तिला रिक्वेस्ट पाठवून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. स्वतः औद्योगिक वसाहतीत कंत्राटदार असल्याचे त्याने भासवले होते.
पीडितेने घरच्यांना भेटून पुढील चर्चा करू, असे सांगितल्याने शेख १ डिसेंबरला हातकणंगले तालुक्यातील तिच्या गावी जाऊन घरच्यांना भेटला होता. त्याचे आई-वडील एका अपघातात दगावल्याने तो एकटाच असल्याचे त्याने यावेळी पीडितेच्या घरच्यांना सांगितले होते. संशयिताने पीडितेशी व्हॉटस्ॲपवरून संवाद वाढवत तिचा विश्वास संपादन केला. ११ डिसेंबरला शहरातील एका लॉजवर भेटण्यास बोलावून भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. तसेच याची वाच्यता कोठे केल्यास बदनामीची धमकी दिली.
व्यवसायासाठी संशयिताने पीडितेची अंगठी गहाण ठेवत २५ हजार उकळले; तर १२ डिसेंबरला प्राप्तिकराचा छापा त्याच्यावर पडल्याचे भासवून तो पुन्हा कोल्हापुरात आला. पीडितेकडे सोन्याच्या बांगड्या, गंठण, झुबे असे ११ तोळे दागिने असल्याची माहिती झाल्याने ते दागिने मागून घेतले.
प्राप्तिकराची कारवाई टाळण्यासाठी ११ तोळे दागिने व १ लाख ६९ हजारांची रक्कम घेतली. मात्र, यानंतर वेगवेगळी कारणे सांगून तो पीडितेला टाळू लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात येताच तिने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.