जयपूर : एका अतिशय भीषण अपघाताची घटना राजस्थानमधून समोर आली आहे. यात भीलवाडा जिल्ह्यातील कोत्री पोलीस स्टेशन परिसरात जयपूरहून संवलियाजीकडे जाणारी रोडवेज बस आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली.
अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अपघातामुळे दुचाकी आणि रोडवेज बसमध्ये भीषण आग लागली. दोन्ही वाहने जळून खाक झाली. बसमधील 50 प्रवाशांना वेळीच सुखरूप बाहेर काढण्यात आलं, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. कोटडी पोलीस ठाण्याचे प्रभारी खिवराज यांनी सांगितलं की, जयपूरच्या वैशाली नगर आगाराची रोडवेज बस जयपूरहून संवलियाजीकडे जात असताना बुधवारी दुपारी कोटडीहून भीलवाड्यासाठी निघाली.
ही बस हातीभाटा चौकाजवळ पोहोचली. तेव्हा अचानक बाजूने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने रोडवेजच्या बसला धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार रस्त्यावर पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
कोटडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गहुली पंचायत हद्दीतील तळेदा गावातील सोनू असं मृताचं नाव असून तो बोअरिंग वाहनावर काम करायचा.
अपघाताच्या वेळी बसमध्ये 40 ते 50 प्रवासी होते, त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. सर्व प्रवाशांना रोडवेज बसमधून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. बसला आग लागल्याने दूरवर आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. अपघातानंतर महामार्गाच्या दोन्ही बाजूला बराच वेळ जाम झाला होता. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचले. जळणाऱ्या रोडवेज बसची आग विझवण्यात आली. बऱ्याच वेळानंतर वाहतूक सुरळीत झाली



