पंढरपूर : येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेमध्ये आज आगळावेगळा असा ख्रिसमस डे संपन्न झाला. या ख्रिसमस डे निमित्ताने प्रशालेच्या प्राचार्या सौ. प्रियदर्शनी सरदेसाई यांच्या संकल्पनेतून “सांताक्लॉज हा फक्त ठराविक मुलांनाच भेटवस्तू देतो असे नाही; तर सर्वच मुलांना तो भेटवस्तू देत असतो.
मग आपण सर्व विद्यार्थीही सांताक्लॉजच्या रूपाने गरजू व अनाथ मुलांना भेटवस्तू देऊ शकतो.” ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या समोर मांडली व या कल्पनेला सर्व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. अनाथ मुलांना सांताक्लॉज हा फक्त स्वप्नच वाटत असतो. परंतु आपण हा सांताक्लॉज तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवू. अशी मुलांना साद घालताच सर्व विद्यार्थ्यांनी भेटवस्तू जमा करून आज ख्रिसमस डे च्या निमित्ताने अनाथ मुलांसाठी आपल्या भावना व्यक्त केल्या. अशा या ख्रिसमस डे चे आयोजन कर्मयोगी विद्यानिकेतन तर्फे करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनून त्यांच्याबरोबर आनंद व्यक्त करण्यासाठी प्रशालेचे शिक्षक श्री श्रीपाद याळगी यांनी सांताक्लॉजची वेशभूषा केली होती. त्याचबरोबर प्रशालेच्या सर्व शिक्षिकांनी सांताक्लॉज चे गाणे म्हणून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. सर्व विद्यार्थ्यांनी आणलेल्या भेटवस्तू एकत्र मांडून सर्व विद्यार्थ्यांचा त्यासोबत फोटो घेण्यात आला. या उपक्रमासाठी सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांनी अतिशय मनापासून भेटवस्तू पाठवल्या. ‘आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो’ ही भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवण्याचे काम प्रशालेच्या प्राचार्या सौ प्रियदर्शनी सरदेसाई यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. हा आगळावेगळा उपक्रम अतिशय स्तुत्य असून असे उपक्रम नेहमी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावेत अशी भावना संस्थेचे चेअरमन माननीय श्री. रोहन परिचारक यांनी व्यक्त केले. प्राचार्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



