👁 5 Views

आषाढी वारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजन – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर


सोलापूर, दि. 28 (जि. मा. का.) : आषाढी वारी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी व भाविक पंढरपुरात येत असतात. आषाढी वारी व्यवस्थितपणे व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी अंतर्गत नियोजनाचा आढावा घ्यावा. पालखी सोहळ्यासह सोबत येणारे वारकरी व भाविकांना पालखी मार्गावर व पालखी तळावर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी परस्पर समन्वय ठेवून योग्य नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिल्या.

आषाढी वारी प्राथमिक पूर्वतयारी नियोजन आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यंदा आषाढी वारी २९ जूनला भरणार आहे. यात्रा कालावधी दि. १९ जून ते ३ जुलै असा आहे. आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश इत्यादि राज्यांतून जवळपास १० ते १२ लाख भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यासह १० प्रमुख मानाच्या पालख्यांसोबत वारकरी मोठ्या संख्येने श्री क्षेत्र आळंदी व देहु येथून पायी येतात. या पार्श्वभूमिवर ही प्राथमिक बैठक घेण्यात आली.


नियोजन भवन सभागृहात झालेल्या या बैठकीस पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी तथा श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव आणि नामदेव टिळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे आदिंसह विविध संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, आषाढी वारी वर्षातील सर्वात मोठी वारी असते. वारी कालावधीत मोठ्या प्रमाणात वारकरी-भाविक पंढरपुरात  येतात. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये. पालखी मार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक नियोजन करण्यात यावे. भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, फिरती शौचालये, आरोग्य सुविधा यासह आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत नियोजन करावे. येणाऱ्या पालखी सोहळ्यांना पालखी मार्गाबरोबरच पालखी तळावर कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. पालखी सोहळा जिल्ह्यात दाखल होण्यापुर्वी वारकऱ्यांसाठी सर्व सोयी सुविधांची सर्व कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे. पालखी मार्ग, विसावे व मुक्कामांच्या तळाची पाहणी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार घटना प्रतिसाद प्रणाली कार्यान्वित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पालखी मुक्काम तळ व पंढरपूर शहरात एकूण २१ आपत्ती प्रतिसाद व मदत केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. संबंधित सर्व विभागांनी संभाव्य आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घ्यावा. जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, आरोग्य विभाग, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती, पोलीस, महसूल, जिल्हा पुरवठा, राज्य उत्पादन शुल्क, उपप्रादेशिक परिवहन, अन्न व औषध प्रशासन विभाग, रेल्वे, भारत संचार निगम आदि संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे म्हणाले, वारी सुखरूप पार पाडण्यासाठी सर्व कामे कालबद्ध पद्धतीने पार पाडावीत. भाविक-वारकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी परस्पर समन्वय ठेवावा.  

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी मंदिर समितीकडून केलेल्या नियोजनाची माहिती दिली.  अतिरीक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी पोलीस प्रशासनाने केलेल्या व करावयाच्या कार्यवाहीची माहिती दिली. आणि निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी सादरीकरण केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *