PANDHARPUR LIVE NEWS : पंढरपुर (प्रतिनिधी) : पंढरपुरच्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात सध्या पुरातन मंदिर जतन संवर्धनासाठीचे काम सुरू आहे. यासाठी मंदिराला पुरातन स्वरुप प्राप्त होण्यासाठी नवीन बांधकाम पाडुन व खोदकाम करुन पुरातन वैभव जतन करण्यासाठीचे कामकाज सध्या युध्द पातळीवर सुरु आहे. यासाठी बाजीराव पडसाळी भागात खोदकाम केले असताना कांही दगडी रांजणसदृश्य वस्तु आढळुन आल्या असुन एक तुटलेला असुन एक सुस्थितीत असल्याचं समजतंय. दुसरा रांजण कापलाय की काय अशीही शंका आहे. या रांजन सदृश्य हंड्यात कांही पुरातन खजिना वगैरे सापडलाय का? आणि हे खोदकाम करताना पुरातत्व खात्याच्या नियम आणि निकषाला अधिन राहुन काळजीपुर्वक खोदकाम चालु आहे का? याबाबत श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने जाहीर खुलासा करावा. याचबरोबर सभा मंडपामधील फरशी काढल्यानंतर संपुर्ण सभा मंडपातील फरशीखाली दगडी शिलालेख बसवलेले आढळुन आले आहेत.
नेमके या शिलालेखांवर कोणत्या लिपीत आणि काय लिहिलेले आहे याचा अभ्यास करुन पुरातत्व खात्याने शोध लावणे अत्यावश्यक आहे. तातडीने पुरातत्व खात्याच्या अधिकार्यांनी पंढरीत येऊन वरील सर्व वस्तुंची पाहणी करावी व त्यांच्याच देखरेखीखाली पुढील कामे व्हावीत, अशी मागणी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली असुन येथील खोदकामात आढळुन आलेल्या वस्तुंचे व शिलालेखाचे फोटो व व्हिडीओ सुध्दा गणेश अंकुशराव यांनी प्रसिध्दीस दिले आहेत.


%20copy.png)