👁 4 Views

Sangli Crime: सांगलीत पर्स लांबवताना महिलेस फरपटत नेले; तिघा दुचाकीस्वारांना नागरिकांचा बेदम चोप

 

Sangli Crime : सांगली शहरातील(Sangli News) अतिशय वर्दळीच्या असणाऱ्या कोल्हापूर रस्त्यावर दुचाकी घेऊन निघालेल्या महिलेच्या पर्सला हिसडा मारणाऱ्या तिघा दुचाकीस्वारांना नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

संशयितांनी महिलेला रस्त्यावरुन अक्षरशः फरपटत नेले. भरदिवसा ही घटना घडल्याने खळबळ उडाली. हजारोंच्या जमावाने गर्दी करत तिघांना ताब्यात दिले. त्यातील दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सुरज सत्ताप्पा भोसले, वैभव कृष्णांत पाटील आणि मुनीब मुस्ताक भाटकर अशी त्या तिघांची नावे आहेत. या घटनेत महिला जखमी झाली. दरम्यान, या सर्व घटनेचा थरार सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

200 फूट पुढे फरपटत घेऊन गेले

हरिपूर रोडवर राहणाऱ्या साधना सातपुते या त्यांची मोपेड दुचाकी पंक्चर झाल्याने त्यांच्या मुलीसह गाडी ढकलत कोल्हापूर रोडवरुन बस स्थानक परिसराकडे निघाल्या होत्या. यावेळी संशयित तिघे त्यांच्याजवळ आले. त्यांनी मदत करण्याचा बहाणा करुन सातपुते यांच्या हातातील पर्स हिसका मारुन पळून घेऊन जाऊ लागले. यावेळी सातपुते यांनी धैर्य दाखवत पर्स सोडली नाही. संशयितांनी त्यांना 200 फूट पुढे फरपटत रस्त्यावरुन घेऊन गेले. यावेळी त्यांच्या पुढे असलेल्या एका कार चालकाने आरशात हा सर्व प्रकार बघितला गाडीतील डाव्या साईडला बसलेल्या तरुणाने गाडीचा दरवाजा उघडला आणि संशयित तिघांची दुचाकी थेट दरवाजाला धडकून ते रस्त्यावर पडले.

नागरिकांनी पकडून दिला बेदम चोप

परिसरात असलेल्या नागरिकांनी धाव घेत तिघांना बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्यांची दुचाकी जप्त करुन तिघांना ताब्यात घेतले. यावेळी दोघेजण हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, भरवस्तीत अशी घटना घडल्याने पोलिसांच्या गस्तीवर जमावाने प्रश्न चिन्ह उपस्थित केला. भरवस्तीत चोरीच्या घटनेमुळे हजारोंचा जमाव परिसरात जमला होता. अक्षरशः अर्धा तास नागरिकांनी संशयितांना धरुन ठेवले होते. त्यानंतर पोलीसानी या चोरट्यांना ताब्यात घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *